… तरच कुलभुषण जाधवांचा परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो – शिवसेना

Kulbhushan Jadhav

मुंबई : चीन काय किंवा पाकिस्तान काय, दोन्ही देश हिंदुस्थानशी ‘मूँह में राम बगल में छुरी’अशाच पद्धतीने वागत असतात. चीनच्या कुरापतीनंतर आता पाकिस्तानलाही हिंदुस्थानविरोधी ‘उचकी’ लागली आहे. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबाबत उफराटा दावा केला आहे. हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप ठेवून अटक केली आहे. त्यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास स्वतः कुलभूषण यांनीच नकार दिला, अशी नौटंकी पाकिस्तानने केली आहे. कुलभूषण यांची अटक हीच मुळात पाकिस्तानची ‘चोरी ती चोरी, वर शिरजोरी’ आहे. परस्परसंबंध आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता याबाबत पाकिस्तानची प्रतिमा जगात नेहमीच वाईट राहिली आहे. तरीही कुलभूषणप्रकरणी तो देश नैतिकेचा बुरखा घालून मानभावीपणा करीत आहे. हा बुरखा केंद्र सरकारने टराटरा फाडायला हवा. त्यासाठी पाकिस्तानच्या उलट्या बोंबा त्यांच्याच घशात घालायला हव्यात, तरच कुलभूषण जाधव यांचा सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. असे शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

आजचा सामना :

परस्परसंबंध आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता याबाबत पाकिस्तानची प्रतिमा जगात नेहमीच वाईट राहिली आहे. तरीही कुलभूषणप्रकरणी तो देश नैतिकेचा बुरखा घालून मानभावीपणा करीत आहे. हा बुरखा केंद्र सरकारने टराटरा फाडायला हवा. त्यासाठी पाकिस्तानच्या उलट्या बोंबा त्यांच्याच घशात घालायला हव्यात, तरच कुलभूषण जाधव यांचा सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

चीन काय किंवा पाकिस्तान काय, दोन्ही देश हिंदुस्थानशी ‘मूँह में राम बगल में छुरी’अशाच पद्धतीने वागत असतात. मध्यंतरी चीनने गलवान खोर्‍यात जाणीवपूर्वक तणाव वाढवला होता. आता पाकिस्तानलाही चीनप्रमाणेच हिंदुस्थानविरोधी ‘उचकी’ लागली आहे. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबाबत उफराटा दावा केला आहे. हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप ठेवून अटक केली आहे. त्यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास स्वतः कुलभूषण यांनीच नकार दिला, अशी नौटंकी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे म्हणणे असे की, कुलभूषण यांना पाक सरकारने 17 जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी म्हणे तसे करण्यास नकार दिला. हिंदुस्थानने अर्थातच पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे. कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानने दबाव आणून त्यांना तसे करण्यास भाग पाडले असाही आरोप हिंदुस्थानने केला आहे. पाकिस्तानची आजपर्यंतची उंटाची चाल पाहता
कुलभूषणवर नक्कीच दबाव टाकला गेला असावा.

एकीकडे पुनर्विचार याचिका न करण्यासाठी दबाव तंत्र वापरायचे आणि दुसरीकडे कुलभूषण यांना दुसरा काऊन्सिलर ऍक्सेस देण्यास तयार असल्याचा आव आणायचा. पाकड्यांचे हे दुटप्पी वागणे नेहमीचेच आहे. कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, तेथील न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही कागदपत्रे देण्यास पाकिस्तानने नकारच दिला आहे.

वास्तविक, आंतरराष्ट्रीय न्याय कायद्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार जाधव यांना आहे. मात्र तोच पाकिस्तानने नाकारला आहे आणि वर स्वतः जाधव यांनीच नकार दिल्याचा कांगावा तो देश करीत आहे. वास्तविक, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देताना आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही ‘पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करीत आहे’, अशी टिपणी केलीच होती. तिकडे चीन आणि इकडे पाकिस्तान, दोन्ही देश आंतरराष्ट्रीय नियम, कायदे, परस्पर करारांतील तरतुदी हिंदुस्थानबाबत गुंडाळून ठेवत असतात. तेच कुलभूषण यांच्या पुनर्विचार याचिकेबाबत पाकड्यांचे सुरू आहे. याबाबत हिंदुस्थानने कडक भूमिका घेतली हे बरेच झाले. तथापि त्यामुळे पाकिस्तानचे शेपूट सरळ होईल असे नाही. पाकिस्तानचा कांगावा म्हणजे हिंदुस्थानला डिवचण्याचाच प्रकार आहे.

कुलभूषण यांची अटक हीच मुळात पाकिस्तानची ‘चोरी ती चोरी, वर शिरजोरी’ आहे. त्यांच्यावर चाललेला खटला हा त्या चोरीला कायदेशीर मुलामा देण्याचा खटाटोप आहे. त्यातही व्हिएन्ना करारातील न्याय्य हक्कांची पायमल्ली पाकिस्तानने केल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयातही उघड झाले आहे. कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती देताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांना काऊन्सिलर ऍक्सेस देऊन शिक्षेचा पुनर्विचार करावा असा आदेशच पाकिस्तानला दिला होता. त्याचे पालन तर दूरच राहिले, उलट कुलभूषण यांच्या कथित नकाराचा देखावा उभा करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे.

कुलभूषण यांच्याकडे बोट दाखवायचे आणि स्वतः नामानिराळे राहायचे असा हा प्रकार आहे. हे पुनर्विचार याचिका प्रकरण पाकिस्तानसाठी उद्या स्वतःच्या पायावर स्वतःच मारलेली कुर्‍हाड ठरू शकते. शिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याची टांगती तलवार आहेच. त्या भीतीतूनच पुनर्विचार याचिकेबाबत टाळाटाळ सुरू आहे. परस्परसंबंध आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता याबाबत पाकिस्तानची प्रतिमा जगात नेहमीच वाईट राहिली आहे. तरीही कुलभूषणप्रकरणी तो देश नैतिकेचा बुरखा घालून मानभावीपणा करीत आहे. हा बुरखा केंद्र सरकारने टराटरा फाडायला हवा. त्यासाठी पाकिस्तानच्या उलट्या बोंबा त्यांच्याच घशात घालायला हव्यात, तरच कुलभूषण जाधव यांचा सुखरूप मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER