जीपीडी 10 % वाढेल, हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये : शिवसेना

Saamana Editorial On GDP

मुंबई :- आगामी वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होऊन तो दुहेरी आकडा गाठेल, असा अंदाज केंद्राने वर्तवला आहे. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता केंद्राने वर्तवललेला अंदाज हा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये, असा खोचक टोला शिवसेनेने सामनाच्या अग्रेलखातून लगावला. विशेष म्हणजे, देशाचा जीडीपी (GDP) 10 टक्के झाल्यास सर्वांसाठीच आनंदाची बाब असल्याचेही शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे.

आजचा सामनातील अग्रलेख :
गेल्या 4 वर्षांपासून होत असलेल्या जीडीपीच्या घसरणीवर भाष्य करण्यात आलंय. कोरोना आणि लॉकडाऊन हे आपली अर्थव्यवस्था घसरण्याचे एक कारण झाले. मात्र, त्याआधीही चार वर्षे सलग आपला जीडीपी वाढीचा वार्षिक दर घसरणाराच राहिल्याचेही यातून सांगण्यात आलंय. सन 2016 मध्ये हा दर 8.26 टक्के होता, तो 2019 मध्ये 5.04 टक्के एवढा खाली आला. चालू वर्षाच्या सुरुवातीला तो 4.2 टक्के इतका घसरला. नंतर तर कोरोना (Corona) संकटाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की, हा दर उणे 23.9 टक्क्यांपर्यंत गडगडल्याचे शिवसेनेने सांगितले आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेच्या अधोगतीला कोरोना हे एक कारण नक्कीच आहे, पण अर्थव्यवस्थेची सध्याची दुरवस्था हा केंद्रातील राज्यकर्त्यांच्या मागील सहा वर्षांतील आर्थिक धोरणांचाही परिपाक आहे. म्हणूनच पुढील वर्षी उणेचा खड्डा भरून काढत जीडीपी 10 टक्के वाढीची झेप घेणार या अंदाजाबाबत जनतेच्या मनात संभ्रम असू शकतो. ही वाढ झाली तर ते चांगलेच आहे. फक्त हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे ठरू नये, असा खोचक टोलाही अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावण्यात आलाय.

लहरी मान्सूनप्रमाणे भरून आला, पण न बरसताच हूल देऊन निघून गेला असे या प्रगतीचे होऊ नये. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संभाव्य दहशतवादी हल्ल्याचे, हाय अॅलर्टचे भोंगे दरवर्षी वाजतात आणि अनेकदा विरून जातात. आता नवीन वर्ष आणि केंद्रीय अर्थसंकल्प तोंडावर आहे. केंद्रीय अर्थमंत्री यंदाचा अर्थसंकल्प न भूतो न भविष्यती असेल असे सांगत असल्या तरी केंद्र सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे, हेदेखील तितकेच खरे आहे. अशा वेळी दहा टक्के वाढीची पिपाणी वाजवून केंद्र सरकारने (Central Government) जिंकल्याचा आव आणू नये इतकेच!, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे .

कोरोनाचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर

डेलॉइट या संस्थेच्या व्हॉइस ऑफ एरिया या अहवालात भारताची अर्थव्यवस्था पुढील वर्षी, म्हणजे 2021-2022 या आर्थिक वर्षात दोन अंकी वृद्धी प्राप्त करेल, असे म्हटले आहे. दुसऱ्या भाषेत जीडीपी वाढीचा दर दहा टक्के असेल. अर्थव्यवस्थेचे गाडे लवकरात लवकर रुळावर आलेले कोणाला नको आहे? मात्र वस्तुस्थिती खरेच तशी आहे का, हा खरा प्रश्न आहे. ज्या कोरोना आणि लॉक डाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले तो कोरोना अद्यापि आपल्या मानगुटीवरून पूर्णपणे उतरलेला नाही. अनलॉक प्रक्रिया सुरू असली आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला जाग आली असली तरी अद्यापि ती अर्धवट ग्लानीतच आहे. त्यात कोरोना विषाणूचा नवा अवतार ब्रिटनमध्ये जन्माला आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगावर चिंतेचे सावट आले असल्याचे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या आमदारानेच केले नाणार प्रकल्पाचे समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER