आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?; शिवसेनेची अग्रलेखातून भावनिक प्रतिक्रिया

Shital Amte-CM Uddhav Thackeray

मुंबई :- ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-कराजगी (Sheetal Amte) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली . या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक नेत्यांनी डॉ. शीतल आमटे-कराजगी यांच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त केलं आहे. आता शिवसेनेने सुद्धा (Shiv Sena) सामनाच्या अग्रेलखातून या प्रकरणावर भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी मन सुन्न करून गेली. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘आनंदवन’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?, अशा भावना शिवसेनेने व्यक्त केल्या .

आजचा सामनातील अग्रेलख :

समाजसेवेचा कौटुंबिक वारसा चालविण्याची ऊर्मी आणि जोडीला अनेकविध कामे करण्याची जिद्द, धडपड असूनही डॉ. शीतल आमटे नैराश्याच्या चक्रव्यूहातून स्वतःला बाहेर काढू शकल्या नाहीत. फक्त आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी, बाबा आमटे यांच्यावर प्रेम करणा-या लाखो लोकांसाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो, हीच प्रार्थना!, असे मतही सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.

वर्ष 2020 काही चांगले गेले नाही. दुःखद घटनांची मालिकाच या वर्षात घडत राहिली. आता वर्ष मावळताना आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कानावर आदळली. जेथे कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलवले गेले तेथेच आणि आमटे कुटुंबातच अशी धक्कादायक घटना घडावी हे दुर्दैवीच म्हणावे लागेल, असंही प्रतिक्रिया सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.

बाबा आमटे यांनी 72 वर्षांपूर्वी आनंदवनाचे बीज रोवले. त्याचा आता एक विस्तीर्ण महावृक्ष झाला आहे. अत्यंत खडतर मार्गावरून बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबाने आनंदवनाची बैलगाडी पुढे नेली. कुटुंबातील प्रत्येकाने या कार्यास हातभार लावला, त्याग केला. त्यात बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटेसुद्धा होत्याच. मात्र त्यांनीच अचानक स्वतःचे जीवन संपवून घेतले. त्यांच्या दुर्दैवी आत्महत्येने नाती आणि भावनिक गुंत्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मध्यंतरी डॉ. शीतल आमटे यांनी समाजमाध्यमांवर आनंदवनाबाबत काही मतप्रदर्शन केले होते. काही कार्यकर्ते आणि विश्वस्तांबाबतही शीतल यांनी आक्षेप घेतले होते.

आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉ. शीतल आमटे चालवित होत्या आनंदवनसारख्या समाजसेवेचा अत्युच्च आदर्श असलेल्या प्रकल्पाबाबत हा प्रकार झाल्याने खळबळ उडणे स्वाभाविकच होते. त्यावर आमटे कुटुंबाने, म्हणजे डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी एक संयुक्त निवेदन जाहीर करून डॉ. शीतल यांचे संस्थेच्या कामात योगदान असले तरी त्यांनी केलेले आरोप अनुचित आणि तथ्यहीन आहेत असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय शीतल या मानसिक तणावात आहेत. नैराश्याशी संघर्ष करीत आहेत असेही म्हटले होते. खुद्द शीतल आमटे यांचा नैराश्यावर मात करण्यासाठी आपण नेमके काय करतो यासंदर्भातील एक व्हिडीओ मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. तरीही नैराश्याची परिणती अखेर डॉ. शीतल यांच्या आत्महत्येतच झाली. डॉ. शीतल या स्वतः महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. ‘आनंदवन’ची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत होत्या. संस्थेच्या कार्यात त्यांचेही योगदान होते. डॉक्टर म्हणून सेवा देत असतानाच आनंदवन, हेमलकसा येथील संस्थांचे वित्त नियोजन, आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनविणे, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबविणे, आनंद मूकबधिर विद्यालय, आनंद अंध विद्यालय या संस्थांचे डिजिटलायझेशन करणे अशा विविध माध्यमांतून आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉ. शीतल आमटे चालवीत होत्या. आनंदवनाचे ‘स्मार्ट व्हिलेज’ बनविणे हे त्यांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. खेडय़ांना तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षम करणारा हा उपक्रम असल्याची त्यांची धारणा होती. त्यांच्या मनात नेमके कोणते ‘युद्ध’ सुरू होते

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने शीतल यांची 2016 मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून निवड केली होती. पुढे हॉर्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही त्यांनी पूर्ण केला. संस्थेतील त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुकही केले होते. तरीही मधल्या काळात काहीतरी बिनसले आणि अंतर्गत वाद दुर्दैवाने कलहाच्या स्वरूपात चव्हाटय़ावर आले. संपूर्ण आमटे कुटुंबाने लोकाश्रयावर विकसित झालेले संस्थेचे काम बाबा आमटे यांच्याच मार्गाने आणि कौटुंबिक एकदिलाने पुढे नेले जाईल अशी ग्वाही दिल्याने सगळे सुरळीत होईल अशी अपेक्षा होती; पण सोमवारी डॉ. शीतल आमटे यांच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी मन सुन्न करून गेली. नैराश्यावर मात करण्यासाठी आपण पेंटिंग कलेचा आधार घेत आहोत असे शीतल यांनीच सांगितले होते. मात्र आता अंतिम क्षणी ‘युद्ध आणि शांतता’ अशी कॅप्शन देत आपलेच एक कॅनव्हास पेंटिंग त्यांनी ट्विट केले आणि जीवनाचे रंगच पुसून टाकले. त्यांच्या मनात नेमके कोणते ‘युद्ध’ सुरू होते आणि कोणती ‘शांतता’ त्यांना अपेक्षित होती या प्रश्नांची उत्तरे आता कधीच मिळणार नाहीत.

ही बातमी पण वाचा : धक्कादायक : का केली असावी शीतल आमटे यांनी आत्महत्या?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER