कोरोनाचा बाप शोधण्यासाठी चीनचा डीएनए तपासणे आवश्यक :शिवसेना

Maharashtra Today

मुंबई :- जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केले. जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प आणि चीनची अर्थव्यवस्था मात्र सर्वोच्च शिखरावर. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाणी कुठे तरी मुरते आहे. जगात एक ताकदवान महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतूनच चीनने कोरोनाला जन्माला घालण्याचे विकृत कृत्य केले असावे, अशी शंका घेण्यास नक्कीच जागा आहे. जागतिक आरोग्य संघटनेला हाताशी धरून चीनने आजवर आपल्या पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. आता दीड वर्षानंतर अमेरिकेने’ कोरोनाचा बाप कोण ?’ हे तपासण्याचे आदेश दिले असले तरी त्याला आता खूप उशीर झाला आहे. कोरोनाचा (Corona) बाप शोधण्यासाठी चीनचा डीएनए तपासणे आवश्यक आहे. चीन तो तपासू देईल काय ?असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

आजचा सामनाच अग्रलेख :

संपूर्ण जगाला मुळासकट हादरवून टाकणाऱ्या कोरोनाचा बाप कोण, याविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नव्याने चर्चेला तोंड फुटले आहे. प्रश्न तसा जुनाच आहे आणि संशयाची सुईदेखील पुनः पुन्हा चीनकडेच वळते आहे. आताही अमेरिका व ब्रिटन या प्रमुख राष्ट्रांनी कोरोनाच्या पापासाठी चीनलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायेडेन यांनी तर 90 दिवसांत कोरोनाचा बाप शोधून काढा, असे आदेशच आपल्या गुप्तचरांना दिले आहेत. चीनने वुहानच्या प्रयोगशाळेत जैविक अस्त्र म्हणून कोरोनाचा कोविड विषाणू जन्माला घातल्याचे सकृतदर्शनी पुरावे समोर येत असल्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी हे पाऊल उचलले हे उघड आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी तर चीनने वुहानच्या प्रयोगशाळेतच कोरोनाचा विषाणू कृत्रिमपणे जन्माला घातल्याचा आरोप केला आहे. चीनची बटीक बनलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी एकदा चीनला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले असले तरी अमेरिकेच्या नव्या चौकशीत कोणता गौप्यस्फोट समोर येतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. जगात केवळ चिनी अर्थव्यवस्थाच पहिल्या क्रमांकावर असावी आणि इतर महासत्तांना मागे टाकून भविष्यात केवळ चीनचाच डंका वाजावा या सैतानी मानसिकतेतून चीनने कोरोनाचे पाप जगावर लादले, असा आरोप वारंवार होतो आहे.

चीनच्या या पापाची फळे आज सारे जग भोगते आहे. कोरोनाने केवळ जागतिक महासत्ताच नव्हे, तर तमाम विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांना चूड लावली. विकसनशील देशांची अर्थव्यवस्था तर रसातळाला गेलीच, पण गोरगरीब देशांना तर या विषाणूने पुरते उद्ध्वस्त केले. जागतिक पातळीवर झालेले हे आर्थिक नुकसान भविष्यात भरून निघेलही, पण सृष्टीतलावरील अखिल मानव जातीला संकटात ढकलून जो महासंहार घडवला गेला त्याचे काय? प्रत्येक देशाचे सरकार आणि तेथील प्रशासन आपल्या देशवासीयांचे जीव वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना जिथे या विषाणूचा जन्म झाला त्या चीनमध्ये मात्र सारे काही आलबेल आहे, हे कसे? शंका घेण्यासारख्या जागा आणि प्रश्न अनेक आहेत. वुहानमध्ये कोरोनाचा विषाणू पसरल्यानंतर पहिले सहा दिवस चीनने जगापासून हे संकट लपवून का ठेवले? कोविडचा विषाणू वुहानच्या मांस बाजारातील वटवाघळातून पसरल्याचा दावा चीनने केला होता. प्रत्यक्षात वुहानच्या जैविक प्रयोगशाळेतच हा विषाणू बनवला गेल़ा त्यानंतर या प्रयोगशाळेतील अनेक वैज्ञानिक आजारीदेखील पडले होते, अशी माहिती आता पुढे येत आहे. चीनच्या काही वैज्ञानिकांनी याविषयी ओरड करताच खडबडून जाग्या झालेल्या चिनी राज्यकर्त्यांनी सगळ्य़ात आधी या वैज्ञानिकांची तोंडे कायमची बंद केली.

कोरोनाचा विषाणू चीनने बनवलेला किंवा मानवनिर्मित नसेल तर वैज्ञानिक आणि डॉक्टरांच्या तोंडाला कुलपे ठो कण्याचे कारणच काय? इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी व काही देशांत तर चौथी लाटही आली आणि कोरोनाच्या जन्मदात्या चीनमध्ये मात्र आजतागायत दुसरी लाटही येऊ नये? सगळ्य़ा जगात कडकडीत लॉकडाऊन लागले.

न्यूयॉर्क, वॉशिंग्टनपासून मुंबई-दिल्लीपर्यंत आणि मॉस्कोपासून आखाती देशांपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात संचारबंदी लागली असताना चीनमधील बीजिंग व शांघायसारखी दाट लोकवस्तीची शहरे मात्र खुलेआम सुरू होती. वुहान वगळता संपूर्ण चीनमध्ये जणू काही घडलेच नाही असेच वातावरण आजही दिसते. जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प आणि चीनची कारखानदारी आणि अर्थव्यवस्था मात्र सर्वोच्च शिखरावर. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाणी कुठे तरी मुरते आहे. अवघ्या जगात हाहाकार उडवून एक ताकदवान महासत्ता म्हणून उदयाला येण्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेतूनच चीनने कोरोनाला जन्माला घालण्याचे विकृत कृत्य केले असावे, अशी शंका घेण्यास नक्कीच जागा आहे. जागतिक आरोग्य संघटनेला हाताशी धरून चीनने आजवर आपल्या पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. आता दीड वर्षानंतर अमेरिकेने ‘कोरोनाचा बाप कोण?’ हे तपासण्याचे आदेश दिले असले तरी त्याला आता खूप उशीर झाला आहे. कोरोनाचा बाप शोधण्यासाठी चीनचा डीएनए तपासणे आवश्यक आहे. चीन तो तपासू देईल काय? असे सवाल शिवसेनेने उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button