कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही : शिवसेना

Bollywood - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईतील (Mumbai) बॉलिवूडला (Bollywood) धक्का देणे हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा,” असा सल्ला शिवसेनेने (Shiv Sena) आजच्या सामनातून दिला आहे.

बॉलिवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत. पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलिवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे,” असेही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आजचा संपुर्ण अग्रलेख वाचा येथे –
बॉलीवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही.

बॉलीवूडला संपविण्याचा डाव खपवून घेणार नाही, असा दम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचायला हवा तेथे तो नक्कीच पोहोचला आहे. हिंदी सिनेसृष्टी म्हणजे बॉलीवूडची पाळेमुळे मुंबईत पसरलेली आहेत. गेल्या शंभर वर्षांपासून ही पाळेमुळे मजबुतीने टिकून आहेत. अनेकांचे कष्ट आणि घाम त्या कारणी लागले आहेत; पण सुशांत मृत्यू प्रकरणानंतर काही पोटदुख्यांनी बॉलीवूडविरोधात जी मोहीम सुरू केली आहे ती धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की, बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा हे क्षेत्र अन्यत्र हलवण्याचे कटकारस्थान कोणी रचत असेल तर ते उधळून लावू.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत परखडपणे यावर भाष्य केले हे बरे झाले. लॉक डाऊन काळात बॉलीवूडचे काम थंडावले. चित्रीकरणावर बंधने आली. टीव्हीवरील मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे; पण सिने जगतावर आजही मंदीच्या सावल्या आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक मोठी आहे; पण कोरोना संसर्गामुळे सात महिन्यांपासून सिनेमागृहे बंद आहेत. सिनेमागृहांचे स्वतःचे एक अर्थकारण आहे. फक्त सिनेमागृहांच्या उद्योगावरच अनेकांचे घरसंसार सुरू असतात. तिकीट विकणारे, खानपान सेवा, इतर तांत्रिक कर्मचारी, साफसफाई करणारे अशा लाखो लोकांचा रोजगार सिनेमागृहांच्या पडद्यामुळे टिकतो. हा पडदाच गेल्या सात महिन्यांपासून काळोखात हरवला आहे. ‘बॉलीवूड’ म्हणजे फक्त नट-नटय़ांची चमकधमक नाही, तर हे असे जोड उद्योगदेखील आहेत. कपडेपट सांभाळणारे, मेकअपमन, लाईटमन, स्पॉटबॉय, साऊंड आर्टिस्ट, डबिंगवाले, वादक, संगीतकार, डमी, एक्स्ट्रामधले कलाकार असे मिळून पाचेक लाख लोकांना थेट रोजगार देणारा हा उद्योग आहे. हिंदी सिनेसृष्टी तर आहेच; पण मराठी, गुजराती, भोजपुरी, दाक्षिणात्य, बंगाली, ओरिया असे त्या त्या भाषेतले मनोरंजन क्षेत्रदेखील आहे. पूर्ण लॉक डाऊन झाल्याने अनेकांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलावंतांवर रस्त्यावर भाजी, फळे वगैरे विकण्याची वेळ आली. तशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काही लहान-मोठे कलाकार, तंत्रज्ञ वगैरेंनी जिवाचे बरेवाईट करून घेतले. हे चित्र काही चांगले नाही. मनोरंजन उद्योगाला आधार देण्याची ही वेळ आहे. त्याऐवजी महाराष्ट्राशी बेइमानी करणारे काही आपमतलबी मनोरंजन उद्योगावर घाव घालीत आहेत. सुशांत राजपूत या कलावंताची आत्महत्या दुर्दैवी आणि धक्कादायक आहे; पण त्याच्या प्रेतावरचे लोणी खाऊन छोटय़ा पडद्यावर जो नंगानाच केला जात आहे तो असह्य आहे. बॉलीवूडचे पाच-दहा प्रमुख लोक येथे बसून पाकिस्तानचा अजेंडा चालवत आहेत असे स्वतःच्या मालकीच्या चॅनेलवरून भुंकले गेले. त्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एकंदरीत 32 प्रमुख लोक या भुंकणाऱयांविरोधात आता न्यायालयात गेले व न्यायालय याबाबत योग्य तो निकाल देईल. बॉलीवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच खोटारडेपणा मोठय़ाने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले? विवेक ओबेरॉयच्या घरावर बंगळुरूच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे. विवेक महाशय हे भाजप गोटातले म्हणून ओळखले जातात व पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉयने साकारली होती. या सर्व ‘ड्रग्ज’ प्रकरणाशी विवेक ओबेरॉयचा संबंध असेल किंवा आहे असे आम्ही म्हणणार नाही; पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही. यानिमित्ताने बॉलीवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. बॉलीवूडला बदनाम करायचे, खच्चीकरण करायचे व हा उद्योग इथून हलवायचा असे मनसुबे काहींनी रचले असतीलच. एका परीने महाराष्ट्राची, मुंबईची ओळख संपवायची असे काहीतरी बंद पडलेल्या पडद्यामागून सुरू आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसाला धक्का लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER