निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो : शिवसेना

CM Uddhav Thackeray - Tejashwi Yadav - Nitish Kumar

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections) भाजप्रणित ‘एनडीए’ला कडवी टक्कर देणाऱ्या तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचे शिवसेनेचे (Shiv Sena) सामानाच्या अग्रलेखातून कौतुक केले आहे . निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा नवा मोहरा दिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे .

आजचा सामनातील अग्रलेख :
तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. तेजस्वीची कोंडी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱ्यांनी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना करुनही तेजस्वी यादव यांनी संयम ढळून दिला नाही. पंधरा वर्षे बिहारवर राज्य करणाऱ्या नितीश कुमार यांच्यावर शेवटच्या टप्प्यात भावनिक आवाहन करण्याची वेळ आली. तेजस्वी यांनी एकतर्फी वाटणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत रंग भरण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात कायम राहील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी बिहारमधील मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र, मतमोजणीच्या संथ गतीमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागला. दरम्यानच्या काळात भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार ‘एनडीए’ने बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले.

त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा (Nitish Kumar) संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला (Congress) केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER