महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारणा-यांनी आता नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे – सामना

Nitish Kumar - Devendra Fadnavis - Sharad Pawar - Saamana

मुंबई : बिहारच्या विजयाची पताका नुकतीच फडकली. भाजप तेथे सत्तेत बसला आहे. बिहारच्या निवडणुकीची धुरा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर होती. फडणवीस ही लढाई जिंकले आहेत. नितीशकुमार (Nitish Kumar) पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमन झाले आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र सामनातून महाराष्ट्रातील भाजप (BJP) नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

बिहारमध्ये भाजपची सत्ता बसली असली तरी, तेथे ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले अशी टीका आजच्या सामनातून केली आहे.

सामनातील महत्त्वाचे मुद्दे –

बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण यावेळी शपथग्रहण सोहळय़ात नेहमीची जान आणि उत्साह नव्हता. संपूर्ण सोहळय़ावर भारतीय जनता पक्षाचीच छाप होती. बिहार निवडणुकीत नितीशकुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विजयाचा उत्सव साजरा करीत आहेत ते ‘भाजप’वीर दुसऱ्या क्रमांकावर आणि तेजस्वी यादवांचा ‘राजद’ पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे, पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद बहाल केले. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱयावरचे तेज उडाले आहे.

नितीशकुमार सलग सात वेळा मुख्यमंत्री झाले ते अशाच तडजोडी करून. भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ‘‘नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.’’ महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. अशी टीका शिवसेनेने आजच्या सामनातून केली आहे. तसेच, नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. बिहारमध्ये ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल.असा टोमणाही शिवसेनेने सामनातून हाणला आहे.

एवढेच नाही तर, महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) पाडापाडीची भाषा करणारे भाजप सरकारवर सामनातून टीका करताना बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. असे म्हटले आहे.

तसेच, महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे (Chandrakant Patil) नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार (Sharad Pawar) चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळय़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल. असे भाकीत शिवसेनेने आजच्या सामनातून वर्तवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER