भंडारा दुर्घटना : आरोग्य व्यवस्थेवर पंडित नेहरुप्रमाणे काम करा; शिवसेनेचा केंद्राला सल्ला

फडणवीस सरकारवरही केली टीका

Uddhav Thackeray - Bhandara District Hospital Fire - PM Narendra Modi

मुंबई :- भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना हृदयाला चर्र करणारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हात जोडून त्या मातांपुढे ऊभे राहिलेत. मात्र, या घटनेने आरोग्यव्यवस्थेसंदर्भात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. रुग्णालयात लागलेल्या आगीत (Bhandara Hospital Fire Accident) 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र सामनामधून केंद्रावर टीका करण्यात आली आहे. राजकारण कमी करुन पंडित नेहरुंच्या (Pandit Nehru) काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे काम करण्याचा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. “दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा,” असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच, हा बेशरमपणाचा कळस अससल्याचे म्हणत सामनातून मागील फडणवीस सरकारवर पण टीका केली आहे. “भंडाऱ्यात दहा बालकांचा मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या दुर्घटनेचे राजकीय भांडवल लगेच सुरू केले. हा बेशरमपणाचा कळस आहे,” असं शिवसेनेने सामना अग्रलेखातून म्हटलंय. तसेच, दहा बालकांचा मृत्यू ही राज्य सरकारची जबाबदारी नक्कीच आहे. मात्र मागची 5 वर्षे सत्तेवर असलेल्यांनाही आपली कातडी वाचविता येणार नाही असे सामनात म्हटले आहे.

राजकारण न करता आत्मचितनाची गरज –
विदर्भाच्या विकासात भंडाऱ्यातील सामान्य रुग्णालयाचा विकास येत नाही काय? हा प्रश्न असला तरी या दुर्घटनेचे राजकारण करणे हे त्या मृत बालकांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच आहे. भंडाऱयातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. यापुढे एकही बालक अशा निर्घृण पद्धतीने दगावणार नाही व माता-पित्यांवर आक्रोश करण्याची वेळ येणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

‘कोविड’शी लढा म्हणजेच फक्त आरोग्य व्यवस्था नाही –

भंडारा दुर्घटनेनंतर सरकारी यंत्रणेने अश्रू गाळण्यापेक्षा आधीच योग्य खबरदारी घेतली तर रुग्णालयांमध्ये होणाऱया दुर्घटना आणि बालकांचे मृत्यू टळू शकतील. आपल्या देशात शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत. कोरोनावरील लस संशोधनाच्या श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच राज्यातील भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालके आगीत गुदमरून मरण पावली. या घटनेने फक्त भंडाराच नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देश हेलावला आहे. राज्यातील नव्हे तर देशातील आरोग्य व्यवस्थेवर या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या वैज्ञानिकांनी कोविडवर लस संशोधन केले. त्या कोविड लसीचा राजकीय उत्सव सुरूच झाला आहे, पण भंडाऱयातील सरकारी रुग्णालयात धड स्मोक डिटेक्टर नव्हते. आगविरोधी यंत्रणा उपलब्ध नव्हती. रुग्णालयातील कर्मचारी बेपत्ता होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आग शॉर्टसर्किटने लागली की आणखी कशाने लागली याची चौकशी केली जाईल. राज्यातील इतर सर्व रुग्णालयांतील शिशू केअरच्या युनिटचेदेखील ऑडिट करण्याचे आदेश सरकारने आता दिले, पण ही जाग दहा बालकांच्या मृत्यूनंतर आली याचे दुःख कुणाला वाटते काय? पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे भंडाऱयातील घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे, पण विषय फक्त भंडाऱयाचा नाही, तर देशातील एकंदरीत आरोग्य व्यवस्थाच गुदमरून तडफडत आहे. देशाच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात सगळय़ात कमी तरतूद ही आरोग्य व्यवस्थेवर असते व त्या हलगर्जीपणाचीच किमत भंडारा रुग्णालयातील दहा नवजात बालकांनी चुकवली आहे. कोरोना काळात सरकारने चांगले काम केले. भव्य कोविड सेंटर्स उघडली.

डॉक्टर्स, नर्सेस यांनी मोठे कार्य केले हे नक्कीच कौतुकास्पद आहे, पण ‘कोविड’शी लढा म्हणजेच फक्त आरोग्य व्यवस्था नाही. महाराष्ट्रातील दुर्गम भागात जनतेला आजही प्राथमिक उपचारांसाठी मैलोन्मैल पायतोड करावी लागते. अनेक बायका रस्त्यातच बाळंत होतात. मृतदेह बैलगाडीतून, हातगाडीवर न्यावे लागतात. महाराष्ट्रासारख्या ‘प्रगत’ वगैरे म्हणवून घेणाऱया राज्यांना हे शोभणारे नाही. आज भंडाऱयातील बालके धुरात जळून आणि गुदमरून मेली. पण विदर्भ, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक आदिवासी पाडय़ांवर शेकडो बालकांचे मृत्यू कुपोषणाने होतच आहेत. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ‘विकास’, ‘प्रगती’ वगैरे शब्दांचा खेळ करण्यात अर्थ नाही. अशा शब्दांत सामनातून देशाच्या आरोग्यव्यवस्थेबाबत केंद्राकडे बोट दाखवले आहे.

ही बातमी पण वाचा : भंडारा दुर्घटना: पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो – मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER