‘कोविड प्रमोटेड’! अंतिम परिक्षांनंतर हे शेपूट कृषी विद्यापीठांमध्येही वळवळले का? – शिवसेना

या सडक्या विचाराचे ‘विषाणू’ कृषी विद्यापीठांच्या डोक्यात शिरले कसे?

Sanjay Raut - Promoted Covid - 19

मुंबई : पदवीच्या अंतिम परिक्षांबाबत(Final Year Examinations) राज्यात घोळ घातला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी पदवी परिक्षा न घेण्याचा विचार राज्यसरकारने केला असतानाही त्यातही राजकारण खेळलेच जात आहे. वरकरणी यूजीसीचे आदेश असले तरी पडद्याआडचे त्यामागचे सूत्रधार वेगळे आहेत हे विद्यार्थी आणि पालकांनाही माहीत आहे. अंतिम परीक्षा घ्यायची नाही ही राज्यसरकारची ठाम भूमिका आहे तरीही अंतिम परीक्षा घेण्याचे शेपूट वळवळतच आहे. असेच एखादे शेपूट कृषी विद्यापीठांमध्येही वळवळले का? या शेपटाने कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-19’(Promoted Covid-19) हा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न शिवसेनेने(Shiv Sena) आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे तसेच भाजपावर अप्रत्यक्ष निशाणाही साधला आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड प्रमोटेड’ असा शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच म्हणावी लागेल. या सडक्या विचाराचे ‘विषाणू’ कृषी विद्यापीठांच्या डोक्यात शिरले कसे? की हे ‘विषाणू’ सोडणारे कोणी भलतेच आहेत? असा प्रश्न शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

एवढेच नाही तर, मुळात ही गोष्ट करण्याची गरजच काय होती? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार कृषी विद्यापीठांना कोणी दिला? असाही प्रश्न सामनातून केला आहे.

आजचा सामना –

कोरोनाच्या(Corona Virus) भयंकर आजारामुळे सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये अस्थिरता आली आहे. माणसाचे मनदेखील कोरोना भयाने आणि या रोगामुळे उत्पन्न झालेल्या अनिश्चिततेमुळे अस्थिर झाले आहे. काही क्षेत्रांतील ही अस्थिरता नैसर्गिक किंवा अपरिहार्य आहे. ती दूर करण्याचे उपाय सरकारी पातळीवरून सुरूच आहेत. मात्र काही अस्थिरता या ‘जाणीवपूर्वक’ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की काय, अशी शंका येण्यास वाव आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अशी ‘जाणीवपूर्वक’ अस्थिरता निर्माण करण्याचे उद्योग लपून राहिलेले नाहीत. पदवीच्या अंतिम परीक्षेबाबत घातला जात असलेला घोळ हा असाच जाणीवपूर्वक आणि ‘नसता’ या श्रेणीतला आहे. आता शिक्षणाशीच संबंधित आणखी एक ‘नसता’ प्रकार उघड झाला आहे. मात्र सरकारने याही बाबतीत खंबीर भूमिका घेतल्याने हा वाद निर्माण होण्यापूर्वीच बाटलीबंद झाला हे चांगले झाले. हा नसता उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला होता राज्यातील कृषी विद्यापीठांनी. कोरोनामुळे परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱया कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारण्याची तयारी या कृषी विद्यापीठांनी चालवली होती. बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत हा प्रकार होणार होता.

मात्र कृषी विद्यापीठांचा हा उपद्व्याप उघड झाला आणि राज्याच्या कृषिमंत्र्यांनी तातडीने त्यासंदर्भात दखल घेत कडक पावले उचलली. त्यामुळे आता कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांवरील ‘प्रमोटेड कोविड-19’ हा उल्लेख वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, सरकारचा दणका बसल्यावर झालेली उपरती आहे. मुळात ही गोष्ट करण्याची गरजच काय होती? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्याचा अधिकार कृषी विद्यापीठांना कोणी दिला? विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड प्रमोटेड’ असा शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच म्हणावी लागेल. या सडक्या विचाराचे ‘विषाणू’ कृषी विद्यापीठांच्या डोक्यात शिरले कसे? की हे ‘विषाणू’ सोडणारे कोणी भलतेच आहेत? राज्याच्या कृषिमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले आहेत. त्यातून काय ते सत्य आणि तथ्य बाहेर येईलच, पण कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील काही प्रवृत्तींच्या मनात विकृतीचे विषाणू कसे थैमान घालत आहेत याचेच हे आणखी एक उदाहरण.

राज्यातील पदवीच्या अंतिम परीक्षांबाबतही असाच विनाकारण घोळ घातला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल म्हणून राज्य सरकारने विद्यार्थीहिताची भूमिका घेतली. मात्र त्यातही राजकारण खेळलेच जात आहे.

वरकरणी यूजीसीचे आदेश असले तरी पडद्याआडचे त्यामागचे सूत्रधार वेगळे आहेत हे विद्यार्थी आणि पालकांनाही माहीत आहे. अर्थात राज्य सरकार आजही पदवीची अंतिम परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे आणि तेच योग्य आहे.

तरीही अंतिम परीक्षा घेण्याचे शेपूट वळवळतच आहे. असेच एखादे शेपूट कृषी विद्यापीठांमध्येही वळवळले का? या शेपटाने कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-19’ हा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला का? हा ‘नसता उपद्व्याप’ सरकारने तातडीने मोडून काढला हे बरेच झाले. परंतु हा प्रकार घडावा, कृषी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणावे आणि त्याचे खापर राज्य सरकारवर फुटावे असा काही डाव होता का? तुम्ही राजकारण जरूर करा, पण त्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, आरोग्य दावणीला का बांधत आहात? विद्यार्थी हा कोणाच्याही स्वार्थी राजकारणाचे ‘साधन’ होऊ नये, मग तीपदवीची अंतिम परीक्षा असो किंवा कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारण्याचा विचार. चांगले काही करता येत नसेल तर वाईट तरी करू नका. हे नसते उपद्व्याप थांबवा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER