१२०० किलोचा दगड खांद्यावर उचणारा ‘रुस्तम- ए- जहाँ’ गामा पैलवान !

Gamma Wrestler Ghulam Mohammad Bakhsh

बडोदा संग्रहालयाला भेट देण्याचा कधी तुम्हाला योग आला तर तिथं तुम्हाला १२०० किलोचा एक दगड दिसेल. या दगडाला खुप प्रेमानं जपून ठेवण्यात आलंय. एखाद्या दगडाला इतक्या अमुल्य गोष्टी ठेवलेल्या वस्तूसंग्रहालयात स्थान का देण्यात आलंय? या दगडाला संग्रहालयापर्यंत पोहचवणारी गोष्ट रंजक आहे. २३ डिसेंबर १९०२च्यादिवशी गुलाम मोहम्मद बख्श (Ghulam Mohammad Bakhsh) या दगडाला घेऊन निघाले. एक माणूस १२०० किलो ग्रॅम वजनाचा दगड घेऊन निघाला होता. ही गोष्ट आश्चर्यकारक होती. गुलाम मोहम्मद बक्ष कोण होता हे सांगितल्यानंतर या गोष्टीवर विश्वास ठेवणं तुम्हाला सोप्प जाईल.

गुलाम मोहम्मद बक्ष उर्फ गामा पैलवान. तोच गामा पैलवान ज्यानं कुस्तितला सर्वोच्च ‘च ‘रुस्तम- ए- जहाँ’ कतिबा जिंकला. तोच गामा पहिलवान ज्याच्या ताकदीमुळंच भारताला विश्ववविजेते पद मिरवता येतं. त्या मोठ्या यादित भारतान स्थान मिळवलं.

गामा पैलवानाचा जन्म २२ मे १८७८ साली अमृतसरमध्ये झाला. त्याचे वडील, काका, चुलतभाऊ सारेच पैलवान होते. त्यांच्या रक्तातच कुस्तीचे डाव होते. गामा पैलवान पाच वर्षाचे असताना त्यांच्या वडीलाचं छत्र डोक्यावरुन हरपलं. तरी त्यांनी कुस्ती आणि आखाड्याशी असलेलं नातं अबाधित ठेवलं. वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांनी सिद्ध केली की पुढं जाऊन कुस्तीच्या जगात त्यांच्या नावाचा डंका वाजणार आहे.

१८९० साली जोधपुरच्या महाराजांनी देशभरातल्या पैलवानांसाठी स्पर्धेच आयोजन केलं. राजाला भारतातला सर्वात ताकदवान पहिलवान निवडायचा होता. देशभरातून ४०० पैलवान या स्पर्धेसाठी आले होते. ज्यांना आपला दम दाखवत शाबासी जिंकायची होती. त्यांना अवघड कसरती करायच्या होत्या, एकमेकांशी कुस्ती लढायची होती. ज्याला हे जमायचं नाही तो स्पर्धेतून बाहेर व्हायचा. गामा पैलवान वयानं आणि उंचीनं सर्वात कमी होता. तरी सुद्धा शेवटच्या १५ पैलवानांमध्ये त्यांनी स्थान मिळवलं. गामा पैलवानानं राजाला प्रभावित केलं. गामा पैलवान यांना या स्पर्धेत विजयी घोषित करण्यात आलं. त्यांच्या नावाची देशभरता चर्चा सुरु झाली.

१९ व्या वर्षी गामा पैलवानानं अनेक मोठ्या पैलवानांना आखाड्यात लोळवलं होतं. ‘रुस्तम-ए-हिंद’ च्या किताबासाठी त्यांची टक्कर रहिम बक्ष सुल्तानीवाला यांच्याशी लढण्याची होती. गामा पैलवानापेक्षा रहिम पैलवानाची उंची दोन फुट जास्त होती. त्याच्या बरोबरीचा कोणीच मल्ला या आधी भारतात नव्हता. लाहोरमध्ये दोघांच्यात कुस्ती होणार होती. ही कुस्ती पहायला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. सात फुटाच्या रहिम पैलवानासमोर पाच फुटाचा गामा पैलवान लहाम मुल वाटतं होतं. सर्वांना वाटलं होतं की गामा पैलवान चितपट होईल. तासंतास कुस्ती सुरु होती. कधी गामा पैलवान डाव टाकायचा तर कधी रहिम पैलवान डाव टाकायचा. प्रेक्षक कधी रहिम पैलवानाच्या बाजूनं घोषणा करायचे तर कधी गामा पैलवानाच्या आणि दोघांवर सट्टाही लावत होते. तासंतास चाललेल्या कुस्तीचा निकाल लागलाच नाही. बरोबरीत सामना सुटला. गामांना मैदान मारता आलं नाही पण रहिम पैलानासोबत बरोबरी करणाऱ्या गामा पैलवानाची भारतभर चर्चा व्हायला सुरुवात झाली.

१८९८ ते १९०७ या काळात गामा पैलवानानं दातियाच्या गुलाम मोहिउद्दीन, भोपाळच्या प्रतापसिंह, इंदौरच्या अली बाबा सेन आणि मुल्कानच्या हसन बक्ष या नामी पैलवानांचा पराभव केला. १९१० मध्ये पुन्हा गामांचा सामना रुस्तम ए हिंद रहिम बख्श सुल्तान वालाशी सामना झाला. यावेळी सुद्धा सामना बरोबरीत सुटला. गामा पैलवान एकमेव असा मल्ल बनला होता ज्याचा कुणची पराभव केला नव्हता. देश जिंकल्यानंतर गामा पैलवानानं जग जिंकायचं ठरवलं आणि त्या मार्गाने काम करायला सुरुवात केली.

१० सप्टेंबर १९१० मध्ये त्यांनी ‘जॉन बुल’ स्पर्धेत सहभाग घेतला. विश्वविजेता स्तानिस्लौस ज्बयिशको या पोलंडच्या पैलवानासोबत गामाचा मुकाबला होता. या पैलवानाला पहिल्याच फेरीत गामानं आसमान दाखवलं. दुसऱ्या फेरीत त्यानं गामाला आपटलं. सामना बरोबरीत सुटला. १७ सप्टेंबरला पुन्हा दोघांचा मुकाबला होता. गामा लढायला आलाच नाही. गामा पैलवान भारताचा पहिला हेवीवेट वर्ल्ड चॅम्पियन बनला. कुस्तीतला हा किताब रुस्तम- ए- जहाँच्या बरोबरीचा होता.

१९११ ला गामा आणि रहिम एकमेकांसमोर आले. यावेळी मात्र सामना बरोबरीत सुटला नाही. गामानं रहिमचा पराभव केला. १९२९ साली गामानं शेवटची कुस्ती लढली. त्यांनी कुस्ती कधीच सोडली नाही. त्यांनी १९५२ ला कुस्तीतून निवृत्ती घेतली. त्यांच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचा पराभव करणं कोणत्याच मल्लाला शक्य नव्हतं.

मानवता धर्म सर्वोत महत्त्वाचा होता

गामा यांनी कुस्तीतच नाही तर मानवतावादी कार्यात देखील सर्वोच्च स्थान मिळवलं. १९४७ च्या फाळणीनंतर पंजाबची आवस्था भयानक झाली होती. फाळणीमुळं हिंदू – मुस्लिम यांच्यात मोठी भिंत निर्माण झाली. गामा तेव्हा अमृतसरमधून लाहोरला आले. मोहिनी गल्लीत त्यांच घर होतं. हिंदूचा जीव धोक्यात असल्याचं पाहून त्यांनी स्वतः अनेकांचा हल्ला रोखला. हिंदूंचा जीव वाचवला आणि सर्वांना स्वतःच्या खर्चानं भारतात पोहचवलं. जगातला अव्वल दर्जाचा पैलवान असणाऱ्या गामा पैलवानानं नेहमी सर्वांना आदर आणि प्रेमानं वागवलं.

२३ मे १९६० साली त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याला इतकी वर्ष उलटून सुद्धा त्यांचा आज उल्लेख होतो. २० व्या शतकातला सर्वात प्रतिभावान मार्शल आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रुसलीनं सुद्धा गामा पैलवानाचं कौतूक केलं होतं. गामा पैलवानांनी व्यायाम करताना वापरलेल्या नियमांचा नंतरच्या काळात ब्रुसलीनं सुद्धा अंगिकार केला. पंजाबच्या पटियालामध्ये ‘नॅशनल इन्सटीट्यूट ऑफ स्पोर्ट म्यूजियम’मध्ये गामा पैलवनांनी कसरतीसाठी वापरलेल्या सर्व साधणांना संवर्धित करुन ठेवलंय. गामा पैलवान सर्वांसाठी इतिहास असला तरी कुस्ती प्रेमींसाठी ते एक प्रेरणेच स्त्रोत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button