ध्यास ग्रामविकासाचा …

अशोक पाटील - उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत)

Ashok Patil

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नुकतीच अशोक पाटील यांची नियुक्ती झाली. गेली दोन तपे विविध पदांवर काम करत असणारे पाटील यांचा कामाचा मुख्य भाग ग्रामीण आहे. त्यामुळेच गेली सव्वीस वर्ष ग्रामीण भागातील नागरिकांशी त्यांची नाळ घट्ट बांधली गेली आहे. त्यांच्या आतापर्यतच्या शासकीय सेवेच्या प्रवासाचा घेतलेला हा धांडोळा.

सन २०१६ – १७ साली जलयुक्त शिवार योजने अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्यात आले…या उपक्रमाची दखल खुद्द राज्य सरकारने घेतली…३१ मार्च २०१७ साली ठाणे जिल्हाचा ग्रामीण भाग हगणदारीमुक्त झाला…या आणि अशा कितीतरी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करण्यासाठी पाटील यांचे योगदान ठळकपणे अधोरेखित करण्यासारखे आहे.

पाटील यांनी आजतागायत गट विकास अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे. दोन- तीन वर्षापूर्वी वनराई बंधारा बांधण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोहीम उभारण्यात आली होती. त्यावेळी पाटील यांनी खेडोपाडी जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधणे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांच्या निवाशी शिबिराला भेट देवून मुलांशी संवाद साधणे, विद्यार्थांच्या मदतीने गावातील बंधारे बांधण्याची मोट्च बांधली होती. मिशन मोडवर हे काम करून काही महिन्यातच तब्बल १५०० वनराई बंधारे बांधले. याचा परिमाण असा झाला की, उपलब्ध झालेल्या ७७५ टीएमसी पाण्यावर १२६५ शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली.

अगदी दोन वर्षापूर्वी जिल्हा हगणदारीमुक्त झाला. हे उद्दिष्ट्य साध्य करणे तसे अवघड होते. मात्र पाटील यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक यंत्रणाना कार्यशील केले. आणि एक अशक्यप्राय गोष्ट साध्य केली. शहापूर सारख्या भागात प्रचंड अडचणी होत्या मात्र गावकर्यांना विश्वासात घेवून कोणतेही काम सहज करता येते हा विचार आत्मसाद करून अनेक दिवस गावांमध्ये राहूनच कामाला दिशा दिली. तसेच जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाड्या/पाड्यांवर पेसा गावांची निर्मिती करण्यात त्याचे मोठे योगदान आहे.

प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने रोजच्या दैनदिन कामाचा निपटारा देखिल त्यांच्याकडून सहजतेने केला जातो.त्यांच्या कामाची पद्धतच नागरिकांना दिलासा देणारी असते.त्यांच्या या पारदर्शी कामाची दखल अनेकदा शासन स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांना यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार, वनराई पुरस्कार, नागरी सेवा पुरस्कार, राजपत्रित अधिकारी पुरस्कार, पंचायत सशक्तीकरण पुरस्कार पुरस्कार देवून गौरवण्यात आले. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत अधिकारी पुरस्कारावरही त्यांनी मोहर उमटवली. आता ते ठाणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.