ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif)  यांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह (corona positive) आला. आपल्या संपर्कातील आलेल्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शक्य असल्यास तपासणी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

गेल्या पाच महिन्यापासून मंत्री हसन मुश्रीफ मंत्रालय, अहमदनगर, कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, कागल आदी ठिकाणी सतत लोकांच्या संपर्कात येत आहेत. सकाळपासून मुश्रीफ यांच्याकडे लोकांची लोंढा लागलेला असतो. आतापर्यंत सातत्याने काळजी घेत असतानाच त्यांना संपर्कातील लोकांमुळेच कोरोनाचा संसर्ग झाला.

गुरूवारी संध्याकाळी ते मुंबईतून मंत्रालयातील कामकाज आटोपून कोल्हपूरला रवाना झाले. काल अंगात ताप आणि कणकणी असल्याने मुश्रीफ यांनी शुक्रवारी सकाळी स्वॅब तपासणी केली. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यानंतर सायंकाळी त्यांनी एचआरसिटी स्कॅन करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सल्यानुसार ते घरी किंवा दवाखान्यातच थांबणार आहे. पुढील काही दिवस कोणालाही भेटणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER