रूपालीने कारमध्ये धरला ठेका

Rupali Bhosale

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये (Mumbai Traffic) कार चालवणे हे किती जिकिरीचे काम आहे हे मुंबईत गाडी चालवणाऱ्यांना चांगलंच माहिती आहे. पण ड्रायव्हिंग हे ज्यांचे पॅशन आहे आणि मुंबईच्या ट्रॅफिकची ज्यांना सवय आहे ते मात्र एकदम धमाल करत गाडी चालवत असतात. इथपर्यंत ठीक आहे; पण मुंबईच्या सतत वाहनांच्या गर्दीने वाहत्या रस्त्यांवर गाडीमध्ये बसल्या जागीच डान्स करत गाडी चालवणे ही काय चीज असते हे अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale) हिने तिच्या चाहत्यांना दाखवून दिलं आहे.

महिनाभरापूर्वी वाढदिवशी तिने घेतलेल्या नव्या कारमुळे ती चांगलीच खुशीत आहे. शूटिंगसाठी सेटवर स्वतः ड्राइव्ह करत जात असताना कारमध्ये लागलेल्या गाण्यावर बसल्या जागीच ड्रायव्हिंग सीटवर तिने ठेका धरला आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अर्थातच रूपालीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला असता तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक करणारी कमेंट दिली आहेच; पण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवत असताना असे लक्ष डायव्हर्ट करू नको, असा मोलाचा सल्लादेखील तिच्या चाहत्यांनी तिला दिला आहे.

२९ डिसेंबर हा रूपालीचा वाढदिवस असतो. गेल्या अनेक वर्षांपासून रूपाली स्वतःची कार घेण्याचे स्वप्न बघत होती. वाढदिवसाचं औचित्य साधून तिने तिच्या स्वप्नातली कार खरेदी केली तेव्हापासून ती तिच्या कारनेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर शूटिंगसाठी जाते. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून डान्स करत असताना रूपालीने पांढराशुभ्र ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच फ्रेश दिसत आहे. वैशिष्ट्य म्हणजे तिच्या गाडीचा रंगदेखील पांढरा आहे आणि जेव्हा रूपाली ही गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला गेली होती तेव्हा गाडीसोबत तिचं बाँडिंग किती घट्ट आहे हे दाखवण्यासाठी तिने स्टायलिश पांढरा ड्रेस घातला होता. ड्रायव्हिंग करत असताना ठेका धरलेल्या रूपालीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

स्वतःची कार असावी असे स्वप्न प्रत्येक जण बघत असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतही करत असतो. असंच स्वप्न पाहिलं होतं अभिनेत्री रूपाली भोसले हिनं. आपल्या स्वप्नातली कार खऱ्या आयुष्यात आपल्या घराच्या दारात उभी राहते तेव्हा होणारा आनंद हा काही वेगळाच असतो. रूपालीने वाढदिवशी स्वतःला नवी कोरी कार गिफ्ट केली. या नव्या कारला तिने डुग्गू असं नाव दिलं आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे रूपाली भोसलेची सध्या चलती आहे. यापूर्वी बिग बॉसच्या सीझनमध्ये रूपाली  दिसली होती. आयुष्यात प्रचंड संघर्ष आणि चढउतार अनुभवल्यानंतर रूपालीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत  अतिशय चांगले दिवस आले आहेत हे ती नेहमी मुलाखतींमध्ये सांगत असते. लग्नानंतर परदेशात तिला तिच्या नवऱ्याकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर त्याच्यापासून वेगळी होत ती पुन्हा भारतात आली. खूप लवकर रूपालीवर तिच्या कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे महाविद्यालयात असताना तिने खूप वेगवेगळ्या नोकऱ्या करून आई आणि भावाला सांभाळले आहे. रूपाली सांगते, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न बघत असतो, त्याचप्रमाणे मीदेखील खूप स्वप्नं  बघितली होती; पण कमी वयामध्ये माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्यामुळे मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा परिस्थितीच तशी होती. परंतु आता माझे दिवस नक्कीच बदलले आहेत. मध्यंतरी अशी एक वेळ होती जेव्हा माझ्या हातात काहीच काम नव्हतं. पण हिंदी सिरियल मला मिळाली आणि त्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता दिली. माझे हे काम प्रेक्षकांना आवडत आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला आयुष्याचा जोडीदारदेखील मिळाला असून लवकरच आम्ही लग्नही करणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER