राष्ट्रवादी सोडून जाणा-यांना रुपाली चाकणकर यांनी वाहली श्रद्धांजली

Rupali Chakankar

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत जाणा-या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे. पक्षात अनेक पदे उपभोगून झाल्यानंतर पक्ष सोडून जाणा-यांना आम्ही श्रद्धांजली वाहत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांची अडचण वाढली; बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा नोंदवण्याचे आदेश

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. उदयनराजे यांनी मंगळवारी रात्री प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, उदयनराजे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीबरोबरच खासदारकीची पोटनिवडणूक शक्य असेल तर राजीनामा देण्याची तयारीही उदयनराजे यांनी दाखवली आहे.

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीस हिरो, तर शरद पवार खलनायक; भाजपचा नवा व्हिडिओ

उदयनराजेंच्या राष्ट्रवादीच्या खासदराकीच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला परत एकदा मोठा धक्का बसू शकतो. उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. उदनराजेंनी भाजपप्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नातेवाईक असणारे पद्मसिंह पाटील घराणे देखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पद्मसिंह पाटलांसह त्यांचा मुलगा आमदार राणाजगजितसिंह भाजपात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटणचे नेते रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. रामराजे आणि भाजप नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. करमाळ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल, माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तसच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे ही भाजप आणि शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.