रूपल होणार श्रीमंताघरची सून

Rupal Nand

गेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावरच्या असो किंवा मोठ्या पडद्यावरच्या असो, सेलिब्रिटींचे लग्न ठरल्याच्या बातम्या येत आहेत. ऑनस्क्रीनही काही मालिकांमध्ये लग्नाचे सोहळे होत आहेत तर काही मालिकांमध्ये लग्न ही संकल्पना वेगळ्या मांडणीतून, कथांमधून सादर केली जात आहे. ऑफस्क्रीनदेखील कार्तिकी गायकवाडपासून ते अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी, मिताली मयेकर पर्यंत अनेकींनी बोटात शगुनाची अंगठी घातली आहे. थोडक्यात काय तर होणार सून मी त्या घरची हे गाणं अनेकींच्या ओठावर आलं आहे. अभिनेत्री रूपल नंद (Rupal Nand) हीच्याही लग्नाची स्टोरी आकाराला येत आहे. पण ही स्टोरी तिच्या खऱ्या आयुष्यातील नसून छोट्या पडद्यावर येणाऱ्या नव्या मालिकेच्या निमित्ताने रूपल लवकरच श्रीमंताघरची सून होणार आहे.

कोण म्हणतं लाडाकोडात, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या श्रीमंत घरच्या मुली या संस्कार नसलेल्या असतात. ? गर्भश्रीमंत मुलीदेखील घराची रित पाळणाऱ्या, मोठ्यांचा आदर ठेवणाऱ्या, नम्रतेने वागणाऱ्या असतात. हे दाखवून देणारी श्रीमंताघरची सून ही मालिका टिव्हीवर दाखल होण्याची चाहूल प्रोमोमधून दिसत आहे. यामध्ये जिला आपण श्रीमंताघरची सून म्हणून पडद्यावर पाहणार आहोत ती रूपल नंद या भूमिकेची खास तयारी करत आहे. श्रीमंत मुलगी लग्न करून मध्यमवर्गीय कुटुंबात येते किेंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी लग्नानंतर श्रीमंत घरची सून बनते ही कथा आजपर्यंत अनेकदा मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमातून पडद्यावर आपण पाहिली आहे. पण रूपल जी भूमिका साकारणार आहे ती मुलगीही श्रीमंताची आहे आणि सून म्हणून जाणारं घर ही संपन्न आहे. मग कथेत ड्रामा येणार कसा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी मालिका ऑन एअर येण्याची वाट पहावी लागणार आहे.

रूपल नंद आणि यशोमान आपटे यांची जोडी या मालिकेच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र काम करणार आहे. आनंदी हे जग सारे या मालिकेत काही दिवसांपूर्वीच यशोमानची एन्ट्री झाली होती. मात्र काही कारणाने ही मालिका आवरती घेण्यात आली तेव्हा रूपल आणि यशोमानचे चाहते नाराज झाले होते. पण आनंदी हे जग सारे ही मालिका जरी निरोप घेणार असली तरी रूपल आणि यशोमानला पाहण्याची संधी मात्र त्यांच्या फॅन्सना मिळणार आहेच. एका मालिकेच्या शेवटानंतर दुसऱ्या मालिकेची सुरूवात होत असल्याने रूपल आणि यशोमान तर खुश आहेतच पण त्यांचा फॅनक्लबही आनंदात आहे.

श्रीमंताघरची सून ही मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी रूपलने तिच्या लूकवर खास काम केले आहे. या भूमिकेसाठी नवा हेअरकटही तिने केला आहे. मूळची पुण्याची असलेल्या रूपलची रूपेरी दुनियेतील एन्ट्री केली ती श्रावणक्वीन या सौंदर्य स्पर्धेने. बेस्ट पर्सनॅलिटी या विभागातील बक्षीस रूपलच्या नावावर कोरले गेले आणि त्यानंतर तिला अभिनय क्षेत्राची दारे खुली झाली. मातीच्या मनातील कविता या कार्यक्रमात रूपलने रसिकांची मनं जिंकली. गोठ या मालिकेतून रूपलने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत एका मोठ्या एकत्र कुटुंबात सून म्हणून येणारी राधा हे पात्र साकारले होते. लग्नानंतर महिला कशा चूल आणि मूल या संकल्पनेत अडकून पडतात आणि त्यांना त्यांच्या छंदांना मुरड घालावी लागते अशी त्या मालिकेची कथा असल्याने रूपलचा लूक साडी किंवा फारतर सलवार कुर्ता इथपर्यंतच होता. पण श्रीमंताघरची सून या मालिकेत रूपल मॉडर्न ड्रेसमध्ये दिसणार आहे. यशोमान आणि रूपल यांची आनंदी हे जग सारे या मालिकेच्या निमित्ताने जुळलेली केमिस्ट्रीही लोकांना पाहता येणार आहे.

रूपल ही डेंटिस्ट असूनही अभिनयाच्या आवडीखातर या क्षेत्रात करिअर करत आहे. मुंबई पुणे मुंबई टू या सिनेमात रूपलची छोटी पण महत्वाची भूमिका होती. श्रीमंताघरची सून या नव्या मालिकेत तिच्यासोबत ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे अनुभवी कलाकार असल्याने तिला सुरूवातीला दडपण आलं होतं, मात्र प्रोमो शूटिंगच्या निमित्ताने त्यांच्यात इतकी छान मैत्री झाली की ते दडपण कुठच्याकुठे पळून गेलं. आता कधी एकदा शूटिंग सुरू होतय याचीच रूपलही वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER