तत्वनिष्ठ मुंढे विरूद्ध सत्ताधारी आमदार

Ruling MLA against on Tukaram Mundhe

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांचे वर्चस्व सुधारून झुगारून आपापल्या भागात समांतर सरकार स्थापन करणारे काही स्वातंत्र्य सैनिक होते. हे ब्रिटिशांचे कायदेकानून मानत नसत. त्यातून समांतर सरकारमधील लोकांचा ब्रिटिश सरकारशी अनेकदा संघर्ष घडे. ब्रिटिशांचे दमनचक्र सुरू राहिले पण त्याला न जुमानता समांतर सरकार चालूच राहत असे. आता ब्रिटिश गेले त्याला 76 वर्षे झाली.आताही काही ठिकाणी समांतर सरकार स्थापित करण्याचे प्रयत्न होतात त्यामुळे सत्ता संघर्ष होतो.

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र एक वेगळेच समांतर सरकार चालवले आहे, ते समाजाच्या हिताचे आहे, पण त्याचा अतिरेक होत असल्याचे आरोप नागपूर शहरात वाढत आहे.मुंढे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. त्या प्रमाणिकपणामुळेच त्यांना आतापर्यंत 10 वर्षात 10 ठिकाणी बदलून जावे लागले, पण त्याची चिंता ते करत नाहीत, कायद्यासमोर ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि आता तर शासनाचे आदेशही ते जुमानत नाहीत.जनतेचे हित त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे, हे त्यांनी राज्य शासनाला दाखवून दिले आहे.

राज्य शासनाने नागपूर शहराला रेडझोनमधून वगळले.मात्र मुंढे यांनी ठणकावून सांगितले की या शहराची गरज लक्षात घेऊन आणि कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन हे शहर रेडझोनमध्येच राहील. शेवटी सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले. त्या आधी राज्य शासनाने ज्या ठिकाणी राज्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी दिली होती त्यात नागपूरही होते पण मुंढे यांनी नागपुरात दारूची दुकाने सुरू केली जाणार नाहीत असे ठणकावून सांगितले.

मुंढे यांच्या विरोधात आता नागपुरातील काँग्रेसचे आमदारच भूमिका घेऊ लागले आहेत. पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे हे शेकडो नागरिकांसह रामनगर भागात रस्त्यावर उतरले. पांढराबोडी; रामनगर भागात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तेव्हापासून हा परिसर महापालिकेने प्रतिबंधित ठेवला आहे. प्रतिबंधाची मुदत 22 मेपर्यंत होती,ती संपली. तरीही बंधने कायम असल्याने लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि ते रस्त्यावर उतरले. लोकांना कोणतेही,व्यवहार करता येत नाहीत, रोजगारासाठी जाता येत नाही, घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे लोक संतप्त झाले आहेत.नागपूर शहराच्या आणखीही काही भागात असाच उद्रेक होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मुंढे यांना काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने नागपुरात महापालिका आयुक्त म्हणून पाठविले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप महापालिकेत सत्तारूढ असलेल्या भाजपची गोची करण्यासाठी मुंढे यांना मुद्दाम पाठवण्यात आले आहे अशी लगोलग चर्चा सुरू झाली.मुंढे विरुद्ध भाजपचे महापौर संदीप जोशी असा संघर्षदेखील अधूनमधून बघायला मिळतोच, पण आता तर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे मुंढेंविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. मुंढे यांच्यासारखे तत्वनिष्ठ, कोणाचेही न ऐकणारे अधिकारी हे दुधारी शस्त्रासारखे असतात.ते जसे भाजपासाठी तापदायक ठरू शकतात तसेच ते सत्तारूढ पक्षासाठीदेखील तेवढेच त्रासदायक ठरू शकतात. नाशिक,सोलापूर, नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका यापूर्वीच बसला आहे. तो नागपुरातील काँग्रेस नेत्यांनादेखील बसेल असे एका राजकीय विश्लेषकाचे म्हणणे आहे.

मुंढे यांना जेव्हा नागपुरात पाठवले तेव्हा मंत्रालयातील एक ज्येष्ठ अधिकारी निवडक पत्रकारांशी खाजगीत बोलताना असे म्हणाले होते की मुंढे यांना काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी नागपुरात पाठवले असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे.मुंढे यांना यांना नागपुरात पाठवण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली.एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस नागपुरात अडचणीत येणार, असे त्यांना हवे होते, असे ते अधिकारी म्हणाले होते, खरेखोटे माहिती नाही.

नागपूर शहराची विकास कामे ते अडवत असल्याची टीका भाजपने चालवली आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांना त्यांनी खीळ बसवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पुढच्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या मुंढेंमुळे विकास अडला अशी टीका करण्याची आयती संधी भाजपला प्राप्त झाली आहे, त्याचा फटका काँग्रेसला नक्कीच बसेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER