रुचिता लग्नात नेसणार आईचा शालू

Ruchita - Maharastra Today
Ruchita - Maharastra Today

अभिनय क्षेत्रातील ग्लॅमर कितीही भुरळ पाडत असलं तरी वेळच्या वेळी लग्न करण्यासाठी आता प्रत्येक सेलिब्रिटी थोडा ब्रेक घेत आहेत. गेल्या वर्षीपासून अनेक कलाकारांनी जोडीदाराची निवड केली. कुणी कोरोनाकाळात मोजक्याच उपस्थितांच्या साक्षीने नव्या आयुष्याला सुरुवात केली तर काही जणांनी कोरोना आटोक्यात यायची वाट बघत यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नगाठ बांधली. आता या यादीत अभिनेत्री रुचिता जाधव (Actress Ruchita Jadhav) हीदेखील आली आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या रुचिताचे लग्न ३ मे रोजी पाचगणीतील एका खाजगी रिसॉर्टमध्ये होणार आहे. सतत सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रुचितानेच आनंदाची बातमी शेअर केली आहे. विशेष म्हणजे तीन दिवस चालणाऱ्या या लग्नसोहळ्यात रुचिताने तिच्या आईचा शालू नेसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोक्यावर अक्षता पडताना रुचिता तिच्या आईच्या शालूमध्ये सजलेली पाहायला मिळेल.

रुचिता मूळची पुण्याची असून तिने आपल्या रुपेरी जगतातील कामाची सुरुवात जाहिरातीपासून केली. एका होजिअरीच्या ब्रँडसाठी रुचिताला मॉडेल म्हणून पहिली संधी मिळाली. त्यानंतर तिने खूप जाहिराती केल्या. यातूनच तिला अभिनयाची गोडी लागली. यापूर्वी तिने माणूस एक माती, वेलकम टू जंगल, फेकमफाक, चिंतामणी, मनातल्या उन्हात या सिनेमात काम केले आहे. पण रुचिताला स्टार बनवले ते ‘लव्ह लग्न लोचा’ या तरुणांच्या मनातील लग्नाविषयी असलेल्या संकल्पना या विषयावर बेतलेल्या मालिकेने. या मालिकेत तिच्या नायकाच्या भूमिकेत अभिनेता विवेक सांगळे होता, जो सध्या आई माझी काळूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

फेसबुक, इन्स्टा या सोशल मीडियावर (Social Media) सतत हॉट फोटो शेअर करणारी आणि व्हिडीओ बनवणारी रुचिता कुणाच्या प्रेमात पडणार अशी चर्चा होती. पण तिने अरेंज मॅरेज करायचे ठरवले. गेल्या वर्षी एका साइटच्या माध्यमातून रुचिताला आनंद माने याचे स्थळ आले. पण तेव्हा रुचिता लग्न करण्याच्या मानसिकेत नसल्याने तिने आनंदला भेटण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. दरम्यान कोरोना साथ आली आणि रुचिता व आनंद यांची भेट झाली नाही. आनंद हा मुंबईतील एक व्यावसायिक असून एका राजकीय पक्षाचा समन्वयक म्हणून काम करतो. डिसेंबर २०२० मध्ये रुचिता आणि आनंद भेटले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. गेल्या महिन्यात आनंदने रुचिताला एकदम रोमँटिक अंदाजात प्रपोज केले. ते फोटोही रुचिताने शेअर केले आहेत.

अर्थातच सध्या कोरोनाचे संकट घोंघावत आहे, अशा परिस्थितीत मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत हे लग्न करत असून जास्त लोकांना बोलवता येणार नाही याची खंतही तिने व्यक्त केली आहे. सध्या तरी लग्नाला ती इंडस्ट्रीतल्या तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवू शकत नसली तरी कोरोना संकट कमी झाल्यानंतर ती एक खास पार्टी केवळ मनोरंजन क्षेत्रातील तिच्या फ्रेंडसर्कला देणार आहे. सध्या तरी लॉकडाऊन असल्याने रुचिताला तिच्या शॉपिंगच्या भटकंतीवर पाणी सोडावं लागलं आहे. शॉपिंगबरोबरच रुचिताला स्वयंपाक करायला खूप आवडतं. आईसोबत तिची खूप छान गट्टी आहे आणि स्वयंपाकाचे धडे तिने आईकडूनच घेतले आहेत. आता मानेंच्या घरी जाऊन रुचिता तिची पाककला दाखवेलच.

ही बातमी पण वाचा : अपूर्वा म्हणाली शेवंताला थँक्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button