
मुंबई: सन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रुबिना मेमनला (Rubina Memon ) तिच्या मुलीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने (High Court)सात दिवसांचा ‘पॅरोल’ (Parole) मंजूर केला आहे. अशा प्रकारे रुबिना १३ वर्षांनंतर प्रथमच तुरुंगातून बाहेर येईल.
रुबिनाने तुरुंग अधिकाºयांकडे आॅक्टोबरमध्येच पॅरॉलसाठी अर्ज केला होता. परंतु दोन महिने उलटूनही त्यांनी त्यावर निर्णय न घेतल्याने तिने उच्च न्यायालयात याचिका केली. न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या.अभय आहुजा यांच्या सुटीकालिन खंडपीठाने तिची याचिका मंजूर केली. पब्लिक प्रॉसिक्युटरने फक्त दोन दिवसांचा पॅरोल द्यावा, अशी विनंती केली. परंतु तुरुंगातील रुबिनाचे वर्तन समाधानकारक असल्याचा तुरुंग अधिकाºयांचा अहवाल व ती गेली १३ वर्षे एकदाही सुटी घेऊन तुरुंगाबाहेर गेलेली नाही हे विचारात घेऊन सात दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला. पॅरोलच्या काळातील पोलीस बंदोबस्ताचे पैसेही रुबिनाने भरावेत, असे आदेशात नमूद केले गेले.
याच खटल्यात दोषी ठरून फासावर लटकविण्यात आलेल्या याकूब मेमनची व १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटांची सर्व आखणी करून ते प्रत्यक्ष घडवून आणण्याच्या काही तास आधी भारतातून परागंदा झालेल्या टायगर मेमनची रुबिना ही वहिनी आहे. तिचे पती सुलेमान हेही बॉम्बस्फोट खटल्यात आरोपी होते. पण सबळ पुराव्याअभावी ते निर्दोष सुटले होते.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला