शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होणार आरटीपीसीआर चाचणी

Covid test

कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत. त्या अनुषंगाने शाळा व शाळा परिसर निर्जंतुकीकरण करून घ्यायच्या आहेत. तसेच शाळेतील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी अर्थात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना यासंबंधी पत्र पाठविले आहे. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंबंधी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होईल या दृष्टीने आवश्यकक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे म्हटले आहे. स्थानिक प्रशासनावर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. सर्व शाळांमधील शिक्षकांची सरकारी कोविड केंद्रात आरटीपीसीआर चाचणी अर्थात वैद्यकीय तपासणी मोफत करण्याची व्यवस्था करावी असे म्हटले आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी शहरातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्रे पाठवून सरकारच्या सूचना निदर्शनास आणल्या आहेत.

यादव यांनी पत्रांत म्हटले आहे, ‘शाळांचे निर्जंतुकीकरण महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत होणार आहे. तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही तपासणी, महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये करून त्याचा अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावयाचा आहे. आरटीपीसीआर तपासणी सुविधा महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र व आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध आहे. तपासणीची वेळ सकाळी १० ते १२ अशी आहे. माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ता. १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची आहे. शाळेकडील एकही कर्मचारी आरटीपीसीआर चाचणीपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. ’ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांची वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण आरोग्य केंद्रात होणार आहे. तशा सूचना सगळ्यांना केल्या आहेत.

राज्य सरकार पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करणार आहे. त्या दृष्टीने माध्यमिक शिक्षकांची वैद्यकीय तपासणी १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत होईल. तर प्राथमिक शाळा सुरू करण्याची अजून तारीख जाहीर केली नाही. दरम्यान शिक्षण विभागाने सगळ्या प्राथमिक शिक्षकांना २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वैद्यकीय तपासणी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER