सरसंघचालकांनी केले मोदी सरकारचे कौतुक

narendramodi mohanbhagwat

Badgeराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तमानात सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या भाषणाला अतिशय महत्व असते. ह्या भाषणात गेल्या वर्षाचा आढावा आणि पुढच्या वर्षीची दिशा सरसंघचालक देतात. त्यामुळे नागपुरात रेशीमबागेत होणाऱ्या दसरा मेळाव्याची स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता असते. सरसंघचालक काय बोलतात ह्याकडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष असते. सरसंघचालक मोहन भागवत यांचे आजचे भाषण काळजीपूर्वक ऐकले तर संघाने मोदी सरकारला अशीच आक्रमक भूमिका चालू ठेवण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे वर्षभरात अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा होईल अशी आशा भागवत यांच्या भाषणाने तमाम हिंदूंमध्ये जागृत झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकार यांच्यातले संबंध दिवसेंदिवस अधिक मधुर होताना दिसत आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारचा काळात संघाचे एवढे मधुर संबंध नव्हते. कधी कधी मतभेदही दिसून आले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रसन्न केल्याचे लपून राहत नाही. एअर स्ट्राईक आणि नंतर काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम मोदींनी रद्द केले. संघाला सरकारचा पवित्रा आवडलेला आहे. पण भागवतांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्याला म्हणावे तसे छेडलेले दिसत नाही. राम मंदिर लवकरात लवकर झाले पाहिजे यासाठी संघ परिवारातील काही मंडळी आणि खास करून शिवसेना अतिशय आक्रमक आहेत. नेहमी मंदिराचा मुद्दा लावून धरणाऱ्या संघाने यावेळी सौम्य भूमिका घेतलेली दिसते. ‘मामला न्यायालयात आहे’ त्यामुळे संघाने कुठलाही आदेश देण्याचा मोह टाळलेला दिसतो.

पण हा एक विषय सोडला तर भागवत यांच्या भाषणात सरकारची आरतीच केली आहे. भागवत म्हणाले, ‘सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सरकारने एकट्याने घेतला नसून त्या निर्णयाला इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. धाडसी निर्णय घेण्याचे क्षमता मोदी सरकारमध्ये आहे.’

देशात झालेले परिवर्तन न आवडणारे लोकही आपल्या देशात आहेत. केवळ स्वार्थ पाहून काम करणारे लोकही देशात व देशाबाहेर आहेत. त्यांना भारताचं चांगलं पाहवत नाही असे सांगताना ‘मॉब लिन्चींग’ वरून भागवत यांनी विरोधकांना चिमटा काढला. हिंसक घटनेशी संघाचा संबंध नसतो, उलट संघ अशा घटना रोखण्याचे काम करत असल्याचे सांगून भागवत म्हणाले, आपल्याकडे ‘लिन्चींग’ हा शब्द कधीच नव्हता. तो बाहेरून आला. संघाची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याकडे लक्ष वेधून ते म्हणाले., पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही संघाची बदनामी करायला शिकले आहेत.