अजितदादांनी शब्द पाळला; कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत

Ajit Dada

अहमदनगर :- कोरोनाच्या संकटकाळातही आपला जीव पणाला लावून पोलीस बांधव फ्रंटलाईनवर कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना काही पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona) लागणही झाली. यात काही जणांचा मृत्यूदेखील झाला. कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारच्या वतीने केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात मृत झालेल्या तीन पोलिसांच्या कुटुंबियांना या मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते या धनादेशांचे वितरण झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्यातच घोषणा केली होती. कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये दिले जातील. मात्र कोरोनामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नसतानाही अजितदादांनी दिलेला शब्द पाळला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सहायक फौजदार आबासाहेब गारुडकर (पोलीस मुख्यालय), संजय पोटे (सोनई) व संतोष शेळके (पारनेर) या तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सरकारने केलेल्या घोषणेनुसार त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत देण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यापासून लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली होती. फ्रंटलाईनवर कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आले. तसेच पोलीस खात्यावरील कामाचा ताण वाढत होता. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सरकाराने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार नगर जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना ही रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER