पंधराव्या वित्त आयोगातील १,४५६ कोटी रुपये बंधीत निधी : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर :- राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे. यापुर्वी इतक्याच रकमेचा अबंधीत निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या आयोगाचा आतापर्यंत २, ९१३ कोटी ५० लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली.

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० टक्के याप्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने घेतला होता. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थासाठी पंधराव्या वित्त आयोगानुसार ५,८२७ कोटी रूपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी मागील महिन्यात १,४५६ कोटी ७५ लाख रूपये अबंधीत अनुदान (अनटाईड) निधी प्राप्त झाला होता व तो जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना कोणत्याही विकास कामावर खर्च करण्यासाठी यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत दादांना पत्र : केली ही विनंती

आता पंधराव्या वित्त आयोगाचा बंधीत निधी १,४५६ कोटी ७५ लाख रुपये काल रोजी प्राप्त झाला आहे. हा निधी हा बंधीत असल्यामुळे तो फक्त पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च करण्यात येईल, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. लवकरच हा निधी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल.

त्यामुळे आतापर्यंत एकूण वार्षिक नियतव्ययच्या ५० टक्के (२,९१३ कोटी ५० लाख रूपये) निधी प्राप्त झाला आहे. यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी प्राप्त झाल्यामुळे ग्रामीण भागात विकासकामे निश्चितच चांगल्या प्रकारे होतील, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER