कृषी विद्यापीठाच्या संशोधन, विकासासाठी १५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता – डॉ.अनिल बोंडे

  • पंजाबराव कृषी विद्यापीठ वैरण पिकांवर संशोधन करणार
  • वैरण संशोधनासाठी 1 कोटी 23 लाख रुपयांचा निधी

मुंबई : कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी प्रतीवर्षी ५० कोटी अशा 3 वर्षांसाठी प्रती विद्यापीठ १५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव सर्व कृषी विद्यापीठांमार्फत कृषी परिषदेला पाठविण्यात यावा, असे निर्देश कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात आज कृषी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. कृषीमंत्री डॉ.बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांसोबतच कृषी संशोधनावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठाला तीन वर्षांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इथेनॉल उत्पादनासोबतच जनावरांना चांगले खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वैरण पिकावर संशोधन करणार आहे. या संशोधनासाठी १ कोटी २३ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय सावंगी येथे वैरण संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जैव ऊर्जा (बायो एनर्जी) उत्पादनामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चारा पिकातील नेपिअर ग्रासवर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधन करणार असून याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल ऑर्गनिक परिसंवाद कार्यक्रमात अधिक माहिती दिली असल्याचेही कृषिमंत्री डॉ.बोंडे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, संचालक विठ्ठल शिर्के, कृषी संशोधन परिषदेचे संचालक (शिक्षण) डॉ.हरिहर कौसडीकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथा तसेच कृषी परिषद, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.