रॉयल चॅलेंजर्सची कामगिरी अगदी ‘हे टोक ते ते टोक’

RCB

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा मोठा मजेशीर संघ आहे. या संघात सुरुवातीपासून भले भले दिग्गज राहिले आहेत पण यशाची पाटी कोरी आहे. या संघाचे एका ओळीत A champion team is always better than the team of champions.

आयपीएलमधील बरेच मजेशीर विक्रम त्यांच्या नावावर आहेत. जसे की आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि सर्वात कमी धावसंख्या त्यांच्याच नावावर आहे. आयपीएलमधील सर्वात छोटा डाव (9.4 षटकं विरुध्द केकेआर) त्यांच्याच नावावर आहे. या डावात एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही हा विक्रम करणारेसुध्दा तेच एकटे.

आता अशा या विक्रमांमध्ये यंदा आणखी दोन विक्रमांची भर पडली आहे. पहिला म्हणजे आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सातदा असं घडलंय की एकाच फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक धावा केल्या आणि या सातही सामन्यातला एक संघ आरसीबीचा आहे. पाच वेळा त्यांच्या फलंदाजांनी हा पराक्रम केलाय आणि दोन वेळा त्यांच्याविरुध्द अशा खेळी झाल्या आहेत.

यातील ताजी खेळी होती ती किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयात के.एल. राहुलच्या शतकाची. या खेळीत के.एल.राहुलने धावा केल्या 132 आणि राॕयल चॕलेंजर्सचा संघ बाद झाला 109 धावात. म्हणजे एकट्या राहुलच्या धावा प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त होत्या.

आयपीएलच्या इतिहासातील अशा प्रकारची ही केवळ सातवी खेळी आहे ज्यात एकाच फलंदाजाने प्रतिस्पर्धी फलंदाजापेक्षा अधिक धावा केल्या. त्यातही टी-20 क्रिकेटचा किंग ख्रिस गेलने दोनवेळा असा पराक्रम केला आहे आणि 2016 मध्ये तर एबीडी विलियर्स व विराट कोहली या दोघांनी एकाच सामन्यात प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

प्रतिस्पर्धी संघापेक्षा एकाच फलंदाजाच्या अधिक धावा

ब्रेंडन मॅक्क्युलम (158)-
केकेआर वि. आरसीबी (82)- 2008

राहुल द्रविड (66)-
आरसीबी वि. राजस्थान (58)- 2009

ख्रिस गेल (175)-
आरसीबी वि. पुणे वॉरियर्स (133)- 2013

ख्रिस गेल (117)-
आरसीबी वि. किंग्ज इलेव्हन (88)- 2015

एबी डी विलियर्स (129)-
आरसीबी वि. गुजरात लायन्स (104)- 2016

विराट कोहली (109)-
आरसीबी वि. गुजरात लायन्स (104)- 2016

के.एल.राहुल (132)-
किंग्ज इलेव्हन वि. आरसीबी (109)- 2020

ह्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्सच्या नावावर दुसरा असा विक्रम लागला जो कुणालाच नको असेल. तो म्हणजे किंग्ज इलेव्हनविरुध्दचा हा सामना त्यांनी 97 धावांनी गमावला आणि आयपीएलच्या इतिहासात पाच किंवा अधिक सामने 90 पेक्षा जास्त धावांनी गमावणारा आरसीबी हा पहिलाच संघ ठरला.

त्यांचे हे मोठे 5 पराभव असे…

140 धावा वि. केकेआर -बंगळुरु- 2008
118 धावा वि. एसआरएच- हैदराबाद- 2019
111 धावा वि. किंग्ज इलेव्हन- धर्मशाला- 2011
97 धावा वि. किंग्ज इलेव्हन- दुबई- 2020
92 धावा वि. सीएसके- पोर्ट एलिझाबेथ- 2009

आता ह्याच्या उलट म्हणजे आयपीएलमधील शंभराहून अधिक धावांचे सर्वाधिक तीन विजयसुध्दा रॉयल चॅलेंजर्सच्याच नावावर आहेत. त्यांच्याएवढे मोठे विजय इतर कोणत्याही संघाने मिळवलेले नाहीत. म्हणजे मोठे पराभव आणि मोठ्या विजयातही हाच संघ आघाडीवर आहे. खरं तर 100 धावांपेक्षा अधिक फरकाने सर्वाधिक विजय व सर्वाधिक पराभव- प्रत्येकी तीन- आरसीबीच्याच नावावर आहेत.

राॕयल चॕलेंजर्सचे 100 पेक्षा अधिक धावांनी विजय…

144 धावा- वि. गुजराथ लायन्स- बंगळुरु- 2016
138 धावा- वि. किंग्ज इलेव्हन- बंगळुरु- 2015
130 धावा- वि. पुणे वाॕरियर्स- बंगळुरु- 2013

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER