नगरपालिका निवडणुकीचा फेरा; शिवसेना शाखाप्रमुखांचा सपत्नीक भाजपात प्रवेश

BJP

ठाणे : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी संधी आणि विजयाची शक्यता लक्षात घेऊन पक्ष निवडणे सुरु केले आहे. शिरगाव शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख दिनेश भोसले यांनी सपत्नीक भाजपा प्रवेश केला. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते त्यांचा भाजपा प्रवेश झाला.

निवडणुकीमुळे बदलापूरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेच्या शाखाप्रमुखानेही सपत्नीक भाजपा प्रवेश केला आहे. राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने यात आघाडी घेत शहरात ठिकठिकाणी जनसंपर्क कार्यालये सुरू करण्याचा व उद्घाटनांचा धडाका लावला आहे. इतर पक्षातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे शहर अध्यक्ष सुरेंद्र यादव व राष्ट्रवादीच्या महिला शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कविता पाटील यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला आघाडी धर्माची आठवण करून देत याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्याने दखल घेत शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला. शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कविता पाटील यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयात आणले आणि कविता पाटील यांचा पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याचे राष्ट्रवादीच्या सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER