मनसैनिकांच्या चुकीमुळे पोलीस चौकशीत अडकलेला रोशन शेख म्हणतो, ‘मी आजही राज ठाकरेंसोबत’

Roshan Shaikh-Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे यांनी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे कार्यकर्तेही कामाला लागल्याचं दिसत आहे. मुंबई पाठोपाठ मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात तिघांना पकडलं होतं. पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी शोधलेले तिघे पोलीस चौकशीमध्ये संशयित घुसखोर बांगलादेशी नसून, भारतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांपैकी रोशन शेख हा मनसेचाच कार्यकर्ता असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, “घडलेला प्रकार चुकून झाला असेल पण यामुळे मी आणि माझे कुटुंबिय काही वेळासाठी दुखावले गेलो. मी मागील अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये राहत आहे. माझ्या आजूबाजूचे अनेकजण आम्हाला चांगलं ओळखतात. यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसण्याची वेळ आली होती. मात्र असं असलं तरी मला त्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा द्वेष वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असावा, मी आजही मनसैनिक म्हणून काम करत सदैव राज ठाकरेंसोबतच राहणार” असं रोशन शेख याने म्हटलं आहे.

मूळचा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील असणारा रोशन पुण्यामध्ये ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर म्हणून काम करतो. बालाजीनगरमधील गुलमोहर सोसायटीमध्ये राहणारा रोशन पुणेकरांना लाजवेल अशी अस्खलित मराठी बोलतो. “मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक अमराठी तरुणांना पक्षात सामील होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होऊन मी मनसेचा कार्यकर्ता म्हणून काम करु लागलो. माला पक्ष सदस्याचे ओळखपत्रही देण्यात आलं होतं,” असं रोशनने ‘पुणे मीरर’शी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पोलिसांना सोबत घेऊन आम्ही ही कारवाई केली होती. रोशनवर आम्हाला संक्षय नव्हता. “या कारवाईदरम्यान सगळ्यांनाच केवळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यात रोशनही होता. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले. तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता असं आम्ही कधी म्हणालोच नाही,” असं स्पष्टीकरण शिंदे यांनी दिलं आहे. “आम्ही बेकायदेशीर पद्धतीने भारतात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात पुढील कारवाया नियोजन पद्धतीने सुरुच ठेऊ,” असंही शिंदे यांनी सांगितलं.

भ्रष्ट ठेकेदाराशी आदित्य ठाकरेंची चर्चा, मनसेने दिले आव्हान