रोनाल्डो विजयांच्या यादीत तिसरा, पहिले दोन कोण?

Cristiano Ronaldo

आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये (Football) विजयांच्या बाबतीत पोर्तुगालचा (Portugal) ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मात्र अजूनही दोन जण त्याच्यापुढे आहेत. पोर्तुगालने मंगळवारी नेशन्स लीगमध्ये क्रोएशियावर 3-2 असा विजय मिळवला. हा रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 101 वा विजय ठरला. यासह त्याने स्पेनच्या झावीला मागे टाकले पण अजूनही स्पेनचा सर्जियो रामोस व स्पेनचाच गोलकीपर इकेर कासियास हे त्याच्या पुढे आहेत. स्पेनचा कर्णधार रामोसच्या नावावर 130 आंतरराष्ट्रीय विजय आहेत तर कॕसियासच्या नावावर 121 विजय आहेत.

यापैकी सर्जियो रामोस सध्या खेळत असून त्याने पुढच्या वर्षी युरौ कप खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याच्या 130 विजयांमध्ये आणखी भर पडेल आणि त्याच्या यशाच्या विक्रमाला गाठण्याचे आव्हान 35 वर्षीय रोनाल्डोसाठी अधिकच कठीण बनेल. सर्जियो रामोस हा सर्वाधिक 178 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला युरोपियन खेळाडू ठरला आहे.

रोनाल्डोला आपल्या 101 व्या विजयात गोल करता आला नाही आणि त्याच्या संघालाही क्रोएशियाने चांगलेच झुंजवले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत 2-2 अशी बरोबरी होती पण अखेरच्या मिनीटांमध्ये रुबेन डायसने गोल करुन पोर्तुगालला विजय मिळवून दिला. यासह युइएफए नेशन्स कपच्या ‘क’ गटात पोर्तुगालचा संघ फ्रान्सनंतर दुसऱ्या स्थानी राहिला.

रोनाल्डो हा पोर्तुगालसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आहे. त्याचा हा 170 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. यात त्याचे 102 गोल असुन आंतरराष्ट्रीय गोलांच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या पुढे केवळ इराणचा अली देई आहे ज्याने 109 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. 2016 च्या युरो कप विजेत्या पोर्तुगीज संघातही रोनाल्डो होता. गेल्या वर्षि पोर्तुगीज संघाने नेशन्स लीग जिंकण्यातही त्याचे योगदान होते. त्यावेळी त्याने स्पर्धेत सर्वाधिक तीन गोल केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER