रोनाल्डोचे आंतरराष्ट्रीय गोलांचे शतक, केवळ दुसराच आणि युरोपातील पहिलाच खेळाडू

Christiano Ronaldo

सर्वश्रेष्ठ फूटबॉलपटू कोण, या चर्चेत ज्याचे नाव नेहमीच येते तो पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Christiano Ronaldo) आणखी एक झेंडा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शंभर गोल करणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे. स्वीडनमधील सोलना येथील नेशन्स लीग सामन्यात स्वीडनवरील (Sweden) विजयात पोर्तुगालचे (Portugal) दोन्ही गोल करुन त्याने हा मैलाचा टप्पा गाठला. यापैकी 45 व्या मिनिटाला केलेल्या गोलसह त्याने आंतरराष्ट्रीय गोलांचे शतक (Hundred Goal) पूर्ण केले आणि 72 व्या मिनिटाला आपल्या गोलांची संख्या 101 वर नेली.

युरोपमधील एकाही खेळाडूला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय गोलांचा शतकी टप्पा गाठता आलेला नव्हता. आपला शतकी गोल त्याने टॉप कार्नरकडून 25 यार्डवरुन एका वळणदार व शानदार फ्री किकवर केला.

रोनाल्डोच्या पुढे कोण?

आता आंतरराष्ट्रीय गोलांबाबत त्याच्या पुढे लियोनेल मेस्सी नाही की ग्रेट पेले नाहीत, तर इराणचा अली दाई ( Ali Daei) नावाचा खेळाडू ” 109 गोलांसह त्याच्यापुढे आहे. रोनाल्डोने शतकाचा टप्पा 165 व्या सामन्यात गाठला तर अलीचे 109 गोल 149 सामन्यांतले आहेत.

आपले गोलांचे शतक पूर्ण करण्यासाठी रोनाल्डोला सव्वासोळा वर्षांचा काळ लागला. त्याने आपला पहिला गोल वयाच्या 19 व्या वर्षी 12 जून 2004 रोजी केला होता तर शतक 8 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण केले.

41 देशांविरूध्द केले आहेत गोल

रोनाल्डोने आपले 101 गोल 41 देशांविरुध्द केले आहेत आणि त्यात प्रदर्शनी सामन्यांतील गोल फक्त 17 टक्के आहेत. याच्या तुलनेत त्याचा स्पर्धक लियोनेल मेस्सीचे 70 गोल 29 देशांविरुध्द आहेत आणि त्यातील जवळपास निम्मे (49 टक्के) गोल हे मैत्रीपूर्ण सामन्यांतील आहेत. ही तुलना निश्चितपणे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोनाल्डो हा मेस्सीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचे दर्शविणारी आहे.

10 महिन्यापासून होता उंबरठ्यावर

35 वर्षीय रोनाल्डोने हा टप्पा कदाचित गेल्या शनिवारीच गाठला असता पण क्रोएशियाविरूध्दच्या सामन्यात तो अंगठा दुखावल्यामुळे खेळू शकला नव्हता. गेल्या 10 महिन्यांपासून तो 99 गोलांवर अडकलेला होता. त्याने याच्याआधीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय गोल नोव्हेंबर 2019 मध्ये लक्झेमबोर्गविरूध्द केला होता. त्याच्याआधीच्या सामन्यात त्याने लिथुआनीयाविरुध्द हॕट्ट्रिक केली होती. पण नंतर कोरानाने खेळ ठप्प पडल्याने त्याचा हा विक्रम लांबला.

स्वीडन व लिथुआनियाविरुध्द सर्वाधिक गोल

रोनाल्डोने सर्वाधिक प्रत्येकी सात गोल स्वीडन व लिथुआनियाविरुध्द केले आहेत. अंडोरा, अर्मेनिया, लाटव्हिया व लक्झेमबोर्ग यांच्याविरुध्द त्याचे प्रत्येकी पाच गोल आहेत. यात त्याच्या सहा हॕट्ट्रिक आहेत. विश्वचषक पात्रता सामन्यांतील 30 आणि युरोपियन चॕम्पियनशीप पात्रता सामन्यांतील 31 गोल आहेत. विश्वचषक स्पर्धेत त्याने सात आणि युरो स्पर्धेत नऊ गोल केले आहेत.

सुनील छेत्री रोनाल्डाच्या मागे

सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये सक्रिय असलेल्यांमध्ये रोनाल्डोनंतर भारताचा सुनील छेत्री (72 गोल) आणि लियोनेल मेस्सीचे (70 गोल) सर्वाधिक गोल आहेत. पण 101 गोल असणारा रोनाल्डो त्यांच्या खूप पुढे आहे. पोर्तुगालसाठी रोनाल्डोनंतर सर्वाधीक गोल पौलेटाचे 47 गोल आहेत. रोनाल्डोने आता त्याच्या दुपटीपेक्षाही जास्त गोल केले आहेत.

महिला फूटबॉलमध्ये 17 शतकवीर

महिलांच्या फूटबॉलमध्ये 17 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय गोलांचे शतक केले आहे. त्यात कॅनडाच्या क्रिस्टीन सिन्क्लेयरचे सर्वाधिक 186 तर अमेरिकेच्या अँबी वाम्बाकचे 184 गोल आहेत.

आंतरराष्ट्रीय सामन्यांतील टॉप-10 गोलस्कोअरर

 • क्रम- खेळाडू (देश) ——– गोल — सामने
 • 1- अली दाई (इराण)——- 109 —149
 • 2- रोनाल्डो (पोर्तुगाल)—— 165 — 101
 • 3- पुस्कास (हंगेरी/स्पेन) — 84 — 89
 • 4- कामामोटो (जपान) ——- 80 — 84
 • 5- चितालू (झांबिया) ——— 79 —108
 • 6- हुसेन सईद (इराक) ——- 78 — 137
 • 7- पेले (ब्राझिल) ————– 77 — 92
 • 8- कोक्सीस (हंगेरी) ———- 75 — 68
 • 9- बशर अब्दुल्ला (कुवेत) — 75 — 133
 • 10- सुनील छेत्री (भारत) —– 72 — 115

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER