… तेव्हा सरकार तरले, मग आताच कसे पडेल? संजय राऊतांचा विरोधकांना ‘रोखठोक’ सवाल

Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते . शिवेसेनकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले, मग आताच कसे पडेल? असा सवाल शिवसेनेच्या ‘सामनाच्या रोखठोक मधून विचारला आहे.

“महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ अंतर्विरोधाने पडेल, असे विरोधकांना का वाटते? तसे घडणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन शिवसेना-भाजपात घडले, पण तेव्हा सरकार टिकले. मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले. मग आताच कसे पडेल?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला .

आजचा संजय राऊत यांचा रोखठोक :
सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्गत झगड्यांतून पडेल, असे एक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे तीन पक्षांत आपसात काही फाटेल आणि सरकार कमजोर होऊन पडेल याकडेच विरोधी पक्षाच्या आशा लागल्या आहेत”, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

“देवेंद्र फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे सरकार अंतर्विरोधाने पडेल. अंतर्विरोध म्हणजे काय? महाराष्ट्रात पाच वर्षे फडणवीस हे मुख्यमंत्री होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार चालले. सरकारमध्ये राहून भाजप-शिवसेना यांच्यात ‘अंतर्विरोध’ नावाचे झगडे रोजच सुरु होते आणि शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊनच फिरत होते. तरीही ते सरकार अंतर्विरोधाच्या ओझ्याने पडले नाही”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“सत्ता ही शेवटी गुळाचीच ढेप असते आणि गुळास चिकटलेले मुंगळे ओढून काढले तरी ढेपेस चिकटून राहतात हा जगाचा नियम आहे. बिहारात नितीश कुमार आणि भाजपमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहेत. हरयाणात भाजप आणि दुष्यंत सिंग यांच्यात आहे, तरीही सरकारे चाललीच आहेत. महाराष्ट्रात असा अंतर्विरोध कुणाला दिसत असला तरी सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करील”, असा विश्वास शिवसेनेने अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ‘ठाकरे सरकार’ स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते. सरकारच्या भवितव्याविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर आहे, हे त्यांचे म्हणणे कायम आहे. काँग्रेसचे चित्तही विचलित झालेले नाही. सत्ताधारी घटक पक्षांच्या आमदारांतील कोणी घोडेबाजारात उभे राहिलेले नाही. त्यामुळे सरकार पडेल असे विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे”, असे राऊत यांनी म्हटले आहे.

“अंतर्विरोधाच्या ठिणग्या उडाल्या तरी सरकारला धोका नाही. कारण हे सरकार टिकायला हवे हे सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाची मजबुरी आहे”, असंदेखील शिवेसेनेच्या मुखपत्रात म्हटले आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार चालवणे ही तीन पायांची शर्यत आहे, पण ज्यांनी आघाडीचे सरकार उत्तम चालवून दाखवले असे शरद पवार हे ठाकरे सरकारचा गोवर्धन करंगळीवर तोलून आहेत. त्यामुळे अंतर्विरोधाचे त्रांगडे होणार नाही आणि मतभेदांची घोंगडी टिकणार नाहीत. राष्ट्रपती राजवट लादायची ठरलेच तर महाराष्ट्राचा क्रमांक 17 वा असेल”, असेही राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER