सरकार पडत नाही म्हणून सुशांत प्रकरणाचा बदनामीसाठी वापर: संजय राऊतांच्या ‘रोखठोक’मधून टीका

Sushant Singh-Sanjay Raut

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या (Sushant Singh Suicide) प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे . . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडत नसल्याने या सरकारला बदनाम करण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर केला जात आहे, अशी टीका राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ (Sammna Rokhthok) या सदरातून केली आहे .

आजचा सामानातील ‘रोखठोक’ :

एखाद्या घटनेचे राजकारण (Politics) केले जाते तेव्हा ते कोणत्या थरापर्यंत जाईल ते सांगता येत नाही. सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याच्या दुःखद आत्महत्या प्रकरणात नेमके तेच सुरू आहे. राजकीय भांडवलाने टोक गाठले आहे.

मुंबईचे पोलीस (Mumbai Police) नीट तपास करणार नाहीत, अशी तक्रार बिहार सरकारची (Bihar Govt) आहे. मुंबई पोलिसांना तपास जमणार नाही. त्यामुळे तो ‘सीबीआय’कडे (CBI) द्या, अशी मागणी बिहारच्या सरकारने केली व २४ तासांत ती मागणी मान्यदेखील झाली. केंद्र सरकारतर्फे अॅटर्नी जनरल तुषार मेहता सर्वोच्च न्यायालयात उभे राहतात व ‘सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाला आहे,’ असे सांगतात. राज्याच्या स्वायत्ततेवर हे सरळ आक्रमण आहे. सुशांत प्रकरण आणखी काही काळ मुंबई पोलिसांच्या हाती राहिले असते तर आभाळ कोसळले नसते, पण एखाद्या विषयाचे राजकीय भांडवल व दाबदबावाचे राजकारण करायचेच म्हटले की, आपल्या देशात काहीही घडू शकेल. सुशांत प्रकरणाची ‘पटकथा’ जणू आधीच लिहिली गेली होती. पडद्यामागे बरेच काही घडले असावे, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल.

मुंबई पोलिसांनीच २६-११चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे. ‘सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे.

गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला, ‘एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते.’’ ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, ‘मग सरकार काय करते?’ पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे, असेही राऊत म्हणाले .

ही बातमी पण वाचा : …तर राज्य सरकार बरखास्त होईल, भाजपचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER