देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार ; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ घणाघात

sanjay-raut-on-farmers-protest-central-government-

मुंबई: दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोक भाष्य केलं आहे. सध्या आपल्या देशात देशद्रोहाचा कायदा कमालीचा स्वस्त झाला आहे. दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून ही घणाघाती टीका केली आहे. पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे; पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

आजच्या सामनातील ‘रोखठोक’

पोलीस दलाचा आणि लष्कराचा उपयोग नागरी जीवनाच्या क्षेत्रात इतका होत नव्हता. गाझीपुरात तो यापुढे होईल असे दिसते. गाझीपुरात जे दिसले ते राज्यकर्त्यांच्या हृदयशून्यतेचे दर्शन आहे. सरकारने भ्रम निर्माण करून सिंघू बॉर्डरवरील पंजाबी नेत्यांना आंदोलनातून बाहेर काढले. सिंघू बॉर्डरवरील आंदोलनाचे नेतृत्व गुरुनामसिंह चढुनी हे किसान नेते करीत होते. हे महाशय सीमेवर होते तोपर्यंत आंदोलनास आर्थिक रसद मोठ्या प्रमाणात मिळत होती. कारण पंजाबच्या शेतकऱ्यांनी ही सीमा ताब्यात घेतली होती. आता हा रस्ता मोकळा केला आहे. शीख विरुद्ध जाट अशी सरळ फूट सरकारने पाडली; पण गाझीपूरला राकेश टिकैत मांड ठोकून उभे आहेत, असं सांगतानाच गाझीपूरच्या बॉर्डरवर खाण्याचे ‘लंगर’ सुरू आहेत व महिला मोठ्या  प्रमाणावर तेथे आहेत. टिकैत यांना सोडून जाणार नाही असा त्यांचा पण आहे. त्यामुळे सरकारने रस्त्यावर खिळेच ठोकले. यावर टिकैत म्हणाले, ‘‘त्यांनी दिल्लीला जाणाऱ्या  रस्त्यांवर खिळे ठोकले; पण आम्हाला दिल्लीला जायचे नाही. कृषी कायदे रद्द करा इतकीच आमची मागणी आहे.’’ पंतप्रधान म्हणतात, ‘‘आंदोलक व शेतकरी यांच्यात एका फोन कॉलचे अंतर आहे!’’ यावर मिस्कील जाट टिकैत म्हणाले, ‘‘मग वेळ कशाला? मला त्यांचा नंबर द्या. मीच फोन करतो!’’ गाझीपूर सीमेवरचा हा खेळ सुरूच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने गाझीपूर, टिकरी, सिंघू बॉर्डरवरील पाणी, विजेचे कनेक्शन कापले आहे. हा अमानुष प्रकार आहे. मोबाईल टॉयलेटची व्यवस्था मोडीत काढल्याने आता तेथे स्वच्छता नाही व घाणीचे साम्राज्य वाढू लागले. तरीही शेतकरी मागे जायला तयार नाहीत.

टिकैत यांची प्रतिष्ठा राहावी हा त्यांचा आता मुख्य मुद्दा आहे. २६ तारखेच्या संध्याकाळी सरकारने बळाचा वापर करून आंदोलनाची बाजी पलटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भावनाविवश झालेले टिकैत यांना हुंदका फुटला. त्या हुंदक्याने शेतकरी मागे फिरले व ‘म्हारो टिकैत’चे फलक घेऊन गाझीपूरला आले. मेरठ, बागपत, मुझफ्फरपूर, जिंद यासारख्या भागात हजारो ‘जाट पंचायती’ झाल्या व टिकैत यांना पाठिंबा वाढू लागला. तेव्हा बळाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने काय केले? पोलिसांनी लाकडाऐवजी स्टीलचे आणि लोखंडाचे दंडुके मोठ्या प्रमाणावर तयार करून घेतले. लाल किल्ल्यावरील शेतकऱ्यांच्या हाती तलवारी होत्या म्हणून पोलिसांच्या एका पथकाने हाती तलवारी घेतलेले फोटो प्रसिद्ध केले. नंतर पोलिसांनी घोडदळाच्या पलटणी आणल्या. तारांचे कुंपण घातलेच; पण दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सिमेंट लावून त्यावर मोठ्या  खिळ्यांची बिछायत निर्माण केली. हे सर्व शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केले असेल तर हे असले सरकार पाकिस्तान व चीनशी काय लढणार, हा प्रश्न आहेच. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील २३५ तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या १४० जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला.

उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केले? दिल्ली-गाझीपूर हा एक तासाचा प्रवास. तेथे धड पोहचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलीस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे. हे सर्व कोणाच्या विरोधात? तर आपल्याच शेतकऱ्यांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱ्यांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले. चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते; पण शेतकऱ्यांना ती संधी नाही. जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षयकुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे, त्यात विदेशी हस्तक्षेप नको.’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले.

शेतकऱ्यांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढ्यास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत. अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक भारतीय नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱ्यांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा, असे राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER