रोहितच्या यशोरथाला किवींनी लावले ब्रेक

वन-डे आणि टी-२० मधील विजयांची मालिका खंडीत

Rohit Sharma on the series of ODIs and T20s

वेलिंग्टन: आपली प्रत्येक मालिका संस्मरणीय बनविणाऱ्या रोहित शर्मासाठी न्यूझीलंडमधील वन डे आणि टी-२० मालिका वेगळ्याच अर्थाने स्मरणात राहतील. या दोन्ही मालिका कर्णधार म्हणून त्याच्या विजयी मालिका खंडीत करणाऱ्या ठरल्या.

वन- डे मालिकेतील चौथ्या सामन्यात हॕमिल्टन येथील पराभवाने त्याच्या नेतृत्वात सलग १२ विजयांची मालिका खंडित केली. यानंतर टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नेतृत्वात सलग सात विजयांची मालिकासुध्दा गेल्या बुधवारी खंडीत झाली आणि आता रविवारी त्याच्याच नेतृत्वात भारतीय संंघाने प्रथमच तीन सामन्यांची द्विपक्षीय टी-२० मालिका गमावली. सलग १० मालिकांमध्ये अपराजित राहण्याची मालिका खंडीत झाली.

ही बातमी पण वाचा:- भारताचा ‘फार्म’ बिघडला, ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न मावळले

रोहितच्या नेतृत्वात भारताने सलग १२ वन डे सामने जिंकले होते परंतु ३१ जानेवारीला हॕमिल्टनच्या सामन्यात ते फक्त ९२ धावांत बाद झाले आणि मार्च २०१८ नंतर कर्णधार म्हणून रोहितला पहिल्यांदाच पराभव स्विकारावा लागला. यासोबत विराट कोहलीच्या सलग १२ वन डे विजयांच्या विक्रमाला मागे टाकण्यात तो अपयशी ठरला.

त्यानंतर आता न्यूझीलंडविरुध्दच्या तीन टी-२० सामन्यांची मालिका आपण १-२ अशी गमावली आणि मागच्या १० मालिकांतील ९ विजय आणि एका बरोबरीची अपराजेय मालिका संपुष्टात आली. भारताने द्विपक्षीय टी-२० मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ आणि धावांचा पाठलाग करताना दिनेश कार्तिक नाबाद राहूनही आपण गमावलेला हा पहिलाच सामना ठरला.

त्याआधी याच मालिकेत पहिला टी-२० सामना भारताने ८० धावांनी गमावला तेंव्हा रोहितच्या नेतृत्वाखाली सलग सात विजयानंतरचा हा पहिला पराभव ठरला. सलग सात विजयांच्या बाबतीत तो ग्रेट एम.एस.धोनीच्या बरोबरीवर होता. धोनीच्या नेतृत्वात तर भारताने दोन वेळा सलग सात टी-२० सामने जिंकले आहेत पण त्याला ओव्हरटेक करणे रोहितला शक्य झाले नाही.

योगायोगाने भारताप्रमाणेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची टी-२० मधील सलग ११ मालिका विजयांची मालिका दक्षिण आफ्रिकेने खंडित केली आणि भारत व पाकिस्तान, या दोन्ही संघांचे नेतृत्व या मालिकांमध्ये प्रभारी कर्णधाराकडे होते.