रोहित पवारांचा पुढाकार; मराठा, धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Rohit Pawar - Janta raja

मुंबई : युती सरकारच्या कार्यकाळात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मराठा, धनगर समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विरोधकांनी या मुद्द्याला उचलून धरत तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. विरोधकांची मागणी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मराठा, धनगर समाजातील तरुणांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही केली होती. मात्र त्यांची ही घोषणा कागोदोपत्रीच राहली. त्यामुळे या तरुणांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत मराठा, धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

‘ठाकरे’ सरकारकडून शेतकऱ्यांना दुसरी आनंदाची बातमी उद्याच मिळणार

या भेटीनंतर रोहित पवारांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत ही भेट सकारात्मक झाल्याचे सांगितले आहे. तरुणांसाठी त्रासदायक ठरलेलं महापोर्टल बंद करण्याचा अपेक्षित निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असला तरी हे सरकार तेवढ्यावरच थांबणार नाही, तर नोकर भरतीसंदर्भात यापुढील कार्यवाहीही युवकांच्या मागणीप्रमाणेच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांनी व्यक्त केला. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापोर्टल बंद केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही केलं.

तसंच आरक्षणासारख्या सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेतल्याबद्दल राज्यातील अनेक मराठा आणि धनगर समाजातील तरुणांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या तरुणांनी कोणतंही गुन्हेगारी कृत्य केलेलं नाही तर त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन केल्यामुळं हे गुन्हे दाखल झाले आहेत. परिणामी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी हे गुन्हे मोठा अडथळा ठरत आहेत. यामुळं या तरुणांना न्याय देण्याची विनंतीही यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडं केली. या तरुणांवर अन्याय झाला असेल तर योग्य निर्णय घेऊन त्यांना यातून बाहेर काढण्यात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं, रोहित पवारांनी म्हटलं आहे.