‘रोहित पवारांचा हिशेब कच्चा, त्यांनी नीट अभ्यास करून बोलावं’; फडणवीसांचे प्रत्युत्तर

Rohit Pawar - Devendra Fadnavis

सातारा : भाजपला (BJP) एवढा कळवळा येत असेल तर त्यांनी राज्याचा केंद्र सरकारकडे अडकलेल्या २६ हजार कोटी रुपयांचा, जीएसटीचा निधी मिळेवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा परंतु भाजप भीतीपोटी केंद्र सरकारविरुद्ध बोलू शकत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. आता त्यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, त्यांचा हिशेब कच्चा आहे. त्यांनी नीट अभ्यास करून बोलावं, असा खरमरीत टोला फडणवीस यांनी लगावला. कराडच्या कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतरते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झालं, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी वेगळेच आकडे सांगायचे, असं न करता नीट अभ्यास करुन बोललं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

जीएसटीच्या थकबाकीवरुनही राज्य सरकारकडून भाजपवर टीका होत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य सरकारचा संचार घेतला. खोटं बोला ते पण रेटून बोला ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पद्धत आहे. मार्चपर्यंत जीएसटीचे पैसे राज्यांना मिळाले आहेत. ही मागणी मार्चनंतरची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

प्रशासनावर कोणाचाच वचक नाही हे दुर्दैवी आहे. करोना रुग्णांच्या बाबतीत देशात महाराष्ट्र हॉटस्पॉट बनले आहे. करोनाचे संकट राजकारणाच्या पलीकडचे आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. सर्वांनी मिळून एकत्रितपणे या संकटाला सामोरे जाण्याची ही वेळ आहे. मात्र एवढे करूनही जनतेला त्रास झाला तर लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेणार हे निश्चित आहे,’ असा इशाराही फडणवीसांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER