…तर तुमच्या नेत्यांनाही लगाम घाला – रोहित पवार

Rohit Pawar

मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. भाजपा नेत्याच्या पुस्तकाने विशेषतः महाराष्ट्रात विरोधाच्या राजकारणाला अजूनच खतपाणी घातले आहे. त्या पुस्तकावरील वादावर उलटसुलट प्रतिक्रिया सुरूच आहेत. या वादात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे. “तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील, तर त्यांनाही लगाम घाला.” असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपाला दिला. भाजपा नेता जय भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेन्द्र मोदी’ या पुस्तकात चक्क शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान मोदींची तुलना करण्यात आली आहे.

या पुस्तकाच्या वादावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे पुस्तक मागे घेत असल्याची माहिती ट्विट करून दिली. त्यांचं ट्विट रिट्विट करून रोहित पवार यांनी यांनी भाजपाला सुनावलं आहे. रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात, “वादग्रस्त पुस्तक मागं घेतलं, ही चांगली गोष्ट केली. पण वाद संपला म्हणण्याऐवजी तो निर्माण करायलाच नको होता. तुमचे नेते लोकभावनेला न जुमानता वरिष्ठांना अंधारात ठेवून वागत असतील, तर त्यांनाही लगाम घाला. नेत्याच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी थोर व्यक्तींशी तुलना करण्याऐवजी अन्य मार्ग शोधा.” असं रोहित पवार म्हणाले.

आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना; ‘सामना’मधून टीकास्त्र

या पुस्तकावरून देशभरातून विरोध झाल्यानंतर लेखक गोयल यांनी हे पुस्तक मागं घेतलं आहे. भाजपा मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. जावडेकर ट्विट करून म्हणाले, “नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपाशी काहीही संबंध नाही. भाजपाच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून, पुस्तकही मागे घेण्यात आले.

हा वाद आता संपला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकांनंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होऊ शकत नाही. ” असं सांगत जावडेकर यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली होती.