राज यांची ही भूमिका घटनेच्या चौकटीत बसणारी नाही : रोहित पवार

Rohit Pawar on Raj Thackeray

मरकजला उपस्थित मुसलमानांना गोळ्या घातल्या पाहिजे. त्यांना कोरोनासंदर्भात कोणताही उपचार दिला जाऊ नये, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी दुपारी म्हटल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यापैकी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया सुस्पष्ट, रोखठोक अशी होती. माध्यमांनी रोहित यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कुठेही राज यांच्या भूमिकेचे अजिबात समर्थन केले नाही. उलट राज यांची ही भूमिका घटनेच्या चौकटीत बसणारी नाही, असे रोहित यांनी सुनावले. जो कोणी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करेल अशा समाजविघातक विषाणूला चिरडून टाकू, असे आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेच आहे आणि तसेच केले पाहिजे, असे सांगत रोहित यांनी रोखठोक भूमिका घेतली.

आज देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे, देशावर कोणती वेळ येऊन ठेपली आहे याचे भान ठेवून प्रत्येकाने बोलले पाहिजे आणि वागले पाहिजे, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना हाणला. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करा.आमचा या देशाच्या घटनेवर विश्वास आहे आणि घटनेची चौकट सोडून बोलणे वा वागणे खपवून घेता कामा नये, असे सांगत रोहित यांनी राज ठाकरे यांच्या विधानांचा समाचार घेतला.

रोहित पवार यांची राजकीय परिपक्वता आणि राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्या ठायी असलेला टोकाचा मोदीद्वेष याचे प्रत्यंतर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राला आले. रोहित हे कर्जत-जामखेड या अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. ते बारामतीचे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू. महाराष्ट्रातील पवार साहेबांचे राजकीय वारसदार म्हणूनदेखील त्यांच्याकडे बघितले जाते. बारामतीतून जाऊन त्यांनी थेट कर्जत-जामखेड गाठले आणि तेथे देवेंद्र फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला. सहा-आठ महिन्यांच्या तयारीत त्यांनी मतदारसंघातील लोकांची मने जिंकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता नऊ मिनिटे घरातील दिवे बंद करून पणती, टॉर्च, मेणबत्तीचा प्रकाश करावा आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण देशाची एकजूट दाखवावी, असे आवाहन देशाला उद्देशून केले. त्यानंतर काहीच मिनिटांत रोहित पवार यांनी एक ट्विट केले. ते असे होते, “दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोना विरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. असा असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवून एकतेचा संदेश अधिक घट्ट करू या, असे देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो. ” एकीकडे रोहित पवार अशी भूमिका घेत असताना जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांनी मोदींविरुद्ध आग ओकली. एकाच पक्षातील नेत्यांच्या भूमिकेत असलेला हा विरोधाभास समोर आल्यानंतर अर्थातच रोहित पवार यांना काही चॅनेल्सनी बोलते केले. त्यावर रोहित यांनी जी उत्तरे दिली त्यातून त्यांच्या ठायी असलेली राजकीय समजच अधोरेखित झाली. रोहित म्हणाले, “नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे मंत्री, नेते पदाधिकारी आहेत. मी कार्यकर्ता आहे. पहिल्यांदाच आमदार झालो आहे. आज कोरोनाविरुद्ध देश एकजूट होण्याची नितांत गरज आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अशाच एकजुटीचे आवाहन केले आहे. समाजात फूट पाडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. अशा वेळी देश जोडण्याची कल्पना पुढे येणार असेल तर त्याचे समर्थन करायला हवे.

मोदी यांनी नऊ मिनिटांबाबत आवाहन करताना केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकार काय काय करत आहे हे सांगायला हवे होते. मात्र त्याबाबत त्यांनी निराशा केली, असे मत आमच्या मंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे आणि त्याच्याशी मीदेखील सहमत आहे. ” या भूमिकेसाठी रोहित पवार यांचे कौतुकच करायला हवे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचे जे समर्थन रोहित यांनी तत्काळ केले होते ते त्यांनी एकीकडे कायम ठेवले आणि दुसरीकडे आपल्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री,नेत्यांचा कुठे अपमान होईल अशी विधानेदेखील केली नाहीत. नवाब मलिक, आव्हाड यांच्याविषयी ते एक शब्दही अनादराने बोलले नाहीत. आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले; पण त्याच वेळी आव्हाड, मलिक यांची भूमिका आक्रस्ताळी असल्याचे ते अजिबात बोलले नाहीत. राजकारणात कुठे किती आणि कसे बोलायचे याचे अचूक भान शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना आहे.

Source:- Jai Maharashtra