शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी रोहित पवारांचा पुढाकार

rohit-pawar-initiative-teacher-husband-and-wife-zp-transfer

मुंबई : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना तोंड द्यावं लागत. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. तसेच बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची मागणी त्यांनी केली.

हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु नंतर मागील भाजप सरकारने एप्रिल २०१७ मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.

याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची मागणी केली. मंत्री महोदयांनीही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

क्रिकेट म्युझिअम उभारणार; आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांची भेट