आघाडी सरकार उत्तम काम करत आहे; गडकरींनी समन्वयाची भूमिका घ्यावी – रोहित पवार

Rohit Pawar-Nitin Gadkari

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये राजकीय श्रेयवाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर राज्याचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

“कोरोनाच्या संकटावर महाविकासआघाडी सरकार उत्तम पद्धतीने उपाययोजना करत आहे. याबाबत केंद्र सरकारने नितीन गडकरींवर महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याचे कळतं आहे. ही जबाबदारी समन्वयाची असेल अशी अपेक्षा आहे, पण समन्वयाऐवजी समांतर जबाबदारी असेल तर ते योग्य वाटत नाही,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. या ट्विटद्वारे रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींनाही टॅग केलं आहे.