सरकार पडावे यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात तेवढे राज्याच्या हितासाठी करा : राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Rohit Pawar - Devendra Fadnavis

मुंबई : कोरोना लसीकरण आणि पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वादंग पेटले आहे . यातच आता विरोधी पक्ष भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. सरकार पडावे  यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात तेवढे राज्याच्या हितासाठी करा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उत्तरप्रदेश आणि राज्याला मिळालेल्या कोरोना लसीच्या तुलनेबाबत केलेल्या विधानाचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तरप्रदेशशी करताहेत. केंद्र सरकारच्या गृहीतकानुसार वेस्ट रेट हा १० टक्के  असू शकतो; पण आपण तो अवघा ३ टक्के  ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.महाराष्ट्राला १.०६ कोटी डोस मिळाले असून, आपण दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आपल्याकडे १० लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील. आज काही ठिकाणी लसींचा साठा संपला.

त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो, असे रोहित पवार यांनी सांगितले. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत, असे रोहित पवार म्हणाले. केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे.

त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकटकाळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच; पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत, असा टोला लगावत संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं राहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button