खडकाळ डोंगर आणि चिंचोळ्या जागेतले झुडूप

Mansavad

अर्चना आणि रचना दोघी बहिणी. एकदा का फोनला सुरुवात झाली की आता कमीत-कमी अर्ध्या तासाची निश्चिंती ! आता असे घरातल्यांना माहीत झालेले होते आणि विषयांना कुठलेच बंधन नव्हते. मग तुझा दिनक्रम, माझा दिनक्रम, वेळ अपुरा पडणे, याबरोबरच आता दोघीही पन्नास- आणि पंचावन्नच्या – साठीच्या झाल्यावर थोडी तब्येतीची कुरकुर, व्यायाम, छोटे-मोठे मानसिकता ताण शेअर करणे चालत असे. आणि बरेचसे बोलता-बोलता त्यांनाच त्यांचे उपाय सापडत असत. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः असेच होत असते .

त्या मनसोक्त गप्पा केल्या, मैत्रिणी किंवा बहिणीशी भेटल्या की त्यांची मने मोकळी होतात आणि त्यांना निर्णय घेणे सोपे जाते आणि उपायही सापडतात. अर्चना मोठी आणि रचना लहान .अर्चना तिचा दिनक्रम सांगत होती. सध्याच्या कोरोना काळात सगळीच कामे घरी होती. पण साधारण दोघेच जण घरी असल्याने निवृत्तीनंतरचा रुटीन ठरलेला ! उलट फार व्यवस्थित आणि काटेकोर .अर्थात वयानुसार सगळीच कामे एकटीने आणि घरात करायची म्हटली की ताण होणारच ! पहिल्यापासून लवकर लवकर करायची सवय, त्यामुळे दम लागायचा ,थकायला व्हायचं. दुसरी गोष्ट मुले दूर .मग उगीचच वाटणारी त्यांची चिंता, वयामुळे स्वतःच्या आणि नवऱ्याच्या तब्येतीची चिंता, एकाकीपणाची भावना. सगळं समजत होतं, पण उमजत नव्हतं. रचनाचा स्वभावही महत्त्वाकांशी.

वयाने अर्चनापेक्षा बरीच लहान, पण बरेच उद्योग एकावेळी करायचे असत. पुन्हा फॅमिली मोठी, येणार जाणार, घरात सासू-सासरे ,त्यांच्या वेळा इत्यादींमध्ये तिलाही अलीकडे खूप स्ट्रेस येत असे. अशीच चर्चा करता करता एक दिवस दोघींच्याही लक्षात आलं की शांतता व समाधान बाहेर शोधून सापडत नाही तर ते आपलं आपणच आतमध्ये शोधावे लागते. दोघीही खूप आपला रुटीन बदलून बघितला. कधी फिरायला जाणे होई, तर प्राणायाम राहून जाई. पण संसारात आपोआपच मुलांच्या वेळा, नवर्‍याचा टिफिन, यांना महत्त्व दिले जाईल आणि एकदा का अशी सवय लागली की, पुढे कितीही प्रयत्न केला तरी या सवयी जात नसत. एक दिवस एक गोष्ट रचनाच्या वाचनात आली. ताईला केव्हा एकदा फोन करते आणि गोष्टीतला मजकूर सांगते असे तिला होऊन गेले.

तिलाही आज-काल लक्षात आलं होतं की साध्या साध्या कारणानेही मन अशांत होण्याची सवय लागली, तर साध्या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण होऊन बसते. गोष्ट अशी होती की, एका व्यापाऱ्याचे एकदा रानात घड्याळ हरविते. रान बरेच मोठे असते व त्या ठिकाणी कमरेपर्यंत गवत वाढलेले असते. त्या घड्याळावर त्याचा खूप जीव असतो. त्यामुळे तो अस्वस्थ होतो. दहा-बारा मजुरांना तो कामाला लावतो. आणि घड्याळ सापडल्यास बक्षीस देण्याचे आश्वासनही देतो. पण संध्याकाळपर्यंत सगळे प्रयत्न करतात, मात्र घड्याळ काही सापडत नाही. अंधार पडत आल्यामुळे तो व्यापारी आशाच सोडतो .तेवढ्यात एक मुलगा छोटा हे सगळे बघत असतो.

तो म्हणतो, “मी प्रयत्न करू का ?” यावर तो व्यापारी परवानगी देतो . मुलगा सगळ्या मजुरांना दूर जायला सांगतो . व्यापाऱ्यालाही शांतपणे एका जागेवर उभे राहायला सांगतो आणि रानात जातो. आश्चर्य म्हणजे दहा मिनिटांत घड्याळ घेऊन तो परत येतो. व्यापाऱ्याला आश्चर्य वाटते. मुलगा म्हणतो, “मजूर गेल्यामुळे सर्वत्र शांतता होती .मी घड्याळाच्या टिकटिक आवाजाचा शोध घेत त्या ठिकाणी गेलो आणि घड्याळ शोधले.” समस्येचा वेध घेण्याकरिता शांतपणे प्रयत्न करावे लागतात हेच खरे ! फ्रेंड्स ! “पीस कॅन ओन्ली बी अचिव्हड बाय अंडरस्टँडिंग !” असे आइन्स्टाइनने म्हटले आहे. आपल्या समोरच्या अडचणी, समस्या, संकटे यामुळे मन अशांत होते असे म्हटले तर त्या परिस्थितीला नीट समजून घेणे ,उपाय शोधणे, त्यावर नियंत्रण मिळवणे ,विविध पर्यायांवर विचार करणे आवश्यक असते.

पण जोपर्यंत मनाला या पद्धतीने आपण कुठे तरी स्थिर करणार नाही तोपर्यंत ते अस्थिर राहणार आहे. या उदाहरणावरून अर्चना व रचना परत विचार करू लागल्या. त्यांनाही हे कळत होतं की, शांतपणे कुठल्याही अडचणी किंवा समस्या नेमकेपणाने शोधल्या आणि सोडवल्या की, आपोआपच मार्ग सापडतो. पण रचना ताईला म्हणत होती, “अगं ताई ! पण मुळात अडचणी आणि समस्या नीट मुळातून समजून घेण्यासाठीसुद्धा मनाची शांतता तर लागतेच न ! ती कुठे आपल्याला मिळते ? सततच काहीना काही तर सुरूच असते. हे मनाचे निवांतपण शोधायचे कुठे ? त्यावर ताई म्हणाली, “अग ऐक ना ! यांनी काल लायब्ररीतून एक पुस्तक आणलं होतं. त्यात इतकी सुंदर गोष्ट होती. एक राजा होता, तो खूप विद्वान आणि कलाप्रेमी होता. एकदा त्याने राज्यातील चित्रकारांसाठी स्पर्धा ठेवली आणि प्रथम येणाऱ्यांसाठी बक्षीस ठेवले .स्पर्धेचा विषय होता- ‘शांती’. अनेक चित्रकारांनी आपल्या अनेक सुंदर सुंदर रचना चित्रित केल्या.

अंतिम स्पर्धेसाठी दोन चित्रांची निवड झाली. दोन्ही चित्रे दरबारात ठेवून राजाने सगळ्यांची मते विचारली. एका चित्रात सुंदर सरोवर होते, हिरवेगार पर्वत, तलावाचे पाणी, शांत नितळ होते , वरती निळे आकाश होते , पांढरे स्वच्छ तरंगणारे ढग होते. पक्षी होते, असा नयनरम्य देखावा होता. दोन्ही चित्रे निसर्गाच्या देखाव्याची होती. तर दुसऱ्या चित्रामध्ये डोंगर खडकाचे होते. आकाश काळेकुट्ट रौद्र ढगांनी भरलेलं होतं .वादळ सुरू झाल्यासारखं दिसत होतं… मुसळधार पाऊस आणि कडाडणाऱ्या विजाही होत्या. त्याचबरोबर डोंगरावरून एक धबधबा कोसळत होता; मात्र ते पाणी वर उडत असताना लाटांसारखं दिसत होतं. जिवंत चित्रण होतं ते ! पण ते विषयाला सुसंगत नव्हतं.

आता राजा चित्राची निवड करणार होता. राजाने दुसऱ्या चित्राची निवड प्रथम क्रमांकासाठी केली. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. राजा म्हणाला , “चित्रातील ढग, वादळ ,विजा पाहून तुम्ही चित्राचे नीट निरीक्षण केले नाही .या धबधब्याच्या बाजूला डोंगराला एक भेग पडलेली आहे. या चिंचोळ्या जागेत एक छोटे झुडूप उगवलेले आहे .या झुडपावर एका पक्षाने एक सुंदर आणि नाजूक घरटे बनविले आहे आणि त्या घरट्यावर एक पक्षीण शांतपणे डोळे मिटून बसलेली आहे . बहुदा ती अंड्यावर बसलेली आहे. खऱ्या शांततेचे दर्शन या दुसर्‍या चित्रात आहे.” संकटे ,अडचणी ,समस्या, दुःख , मतभेद ,अपेक्षाभंग नाही अशी परिस्थिती प्रत्यक्ष जीवनात क्वचितच येते. शांतता म्हणजे अशी जागा नाही जिथे गोंधळ, आवाज, त्रास नाही. शांतता म्हणजेच इथे हे सगळे असूनही हृदय शांत ठेवणे .

अशा परिस्थितीतही मार्ग काढून शांतपणे नवसृजन योजनाचे काम करणे हाच खरा शांतीचा अर्थ आहे. दुसरे चित्र अधिक वास्तव आहे. अर्थातच राजाचे म्हणणे सगळ्यांना पटले. अर्चना म्हणाली , “खूप आवडली ग रचना मला ही गोष्ट ! बाहेर काय सुरू आहे, यापेक्षा आपल्या आत काय सुरू आहे , यावर शांती अवलंबून असते. बाहेरच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण खरंच नसतं. पण आपल्या आत काय व्हावे याचा निर्णय मात्र आपला आहे.” “खरंच ताई तू म्हणतेस ते. मनाकडे सजगपणे पाहण्याची शक्तीही आपल्याजवळ आहे.

पण आपण मनाकडे न बघता त्याला शांत करण्याकरिता दुसरीकडे प्रयत्न करत असतो. नदीकिनाऱ्यावर उभे राहून पाण्याच्या प्रवाहाकडे जसे आपण तटस्थपणे पाहतो तसे मनाकडे पाहण्याचा अभ्यास केला तर मनाला अशांत करणार्‍या कारणांचा शोध नक्कीच घेता येईल.” रचना म्हणाली. दोघीही हसत एकसारख्या म्हणाल्या, “युरेका ! युरेका !” फ्रेंड्स !अशा प्रकारे मनाची शांतता मिळवून आणि आपल्या परिस्थितीला नीट समजून घेऊन जीवन खूप सोपे बनविण्याचा प्रयत्न करू या !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER