वन डे क्रिकेटचे पहिले सामनावीर व शिमलापूत्र समालोचक क्रिकेटपटूंचे निधन

‘ख्रिसमस डे’ चा सर्वत्र उत्साह असताना इंग्लंडच्या दोन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी गेल्या दोन दिवसात जगाचा निरोप घेतला. सलामी फलंदाज जॉन एड्रीच (John Edrich) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी आणि सीम गोलंदाज व समालोचक रॉबिन जॅकमन (Robin Jackman) यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. यामुळे सणासुदीच्या दिवसात इंग्लंडच्या क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

फटकेबाजीसाठी प्रसिध्द असलेले डावखुरे सलामी फलंदाज जॉन एड्रिच यांनी 1963 ते 1976 दरम्यान 77 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 43.54 च्या सरासरीने 5138 धावा केल्या आहेत. त्यांचे उत्तर स्कॉटलंडमधील निवासस्थानी 23 डिसेंबरला नैसर्गिक निधन झाले. सरे काऊंटीसाठी 23 मोसम खेळताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 40 हजार धावा केल्या आहेत. 1970-71 ची अॕशेस मालिका इंग्लंडने 2-0 अशी जिंकली होती त्यात त्यांनी 72 च्या सरासरीने 648 धावा केल्या होत्या. 1965 मध्ये न्यूझीलंडविरुध्दच्या हेडिंग्ले कसोटीत त्यांनी नाबाद 310 धावांची मोठी खेळी केली होती. त्यांच्या नावावर 12 शतके आणि 24 अर्धशतके आहेत. 1974-75 च्या सिडनी कसोटीत त्यांनी इंग्लंडचे नेतृत्वसुध्दा केले होते.

वन डे क्रिकेटच्या सर्वात पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही ते खेळलै होते. याप्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिला चौकार, पहिले अर्धशतक आणि पहिला सामनावीर पुरस्कार त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी त्यावेळी 119 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती.

जॉन यांच्या जाण्याने आम्ही एक सातत्यपूर्ण व धाडसी फलंदाज गमावला आहे. त्यांचे जगातील तत्कालीन आघाडीच्या जलद गोलंदाजांशी गाजलेली द्वंद स्मरणात राहतील. त्यांची कमी सदैव जाणवत राहिल आणि त्यांचे कुटुंबिय व मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्याधिकारी टॉम हॕरिसन यांनी म्हटले आहे.

त्यांना वयाच्या 63 व्या वर्षी ल्युकेमिया असल्याचे निदान झाले होते आणि ते पुढचे फारतर सात आठ वर्ष सोबत राहतील असे सांगण्यात आले होते परंतु त्या आजारावर मात करत त्यांनी वयाची 83 वर्षे पूर्ण केले.

रंगतदार शैलीत समालोचन करणारे माजी सीम गोलंदाज राॕबिन जॕकमन यांनी ख्रिसमसच्याच दिवशी निरोप घेतला. जॅकमन यांचे भारताशी खास नाते होते कारण त्यांचा जन्म हिमाचलमधील शिमला येथे झालेला होता. जॕकमन यांनी इंग्लंडसाठी चार कसोटी आणि 15 वन डे सामने खेळले होते.

जॉन एड्रिच यांच्याप्रमाणेच जॕकमन हेसुध्दा सरे काऊंटीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यांच्या नावावर प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून 1605 बळी आहेत. निवृत्तीनंतर ते दक्षिण आफ्रिकेतील ‘सुपरस्पोर्ट’ वाहिनीसाठी नियमीत व लोकप्रिय समालोचक बनले.

त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटलेय की, राॕबीन जॕकमन यांच्या निधनाचे आम्हाला अतीव दुःख आहे. या दुःखाच्या समयी त्यांचे कुटुंब व मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत.

जॅकमन यांनी वयाच्या 35 व्या वर्षी 1981 मध्ये कसोटी पदार्पण केले आणि चार कसोटीत 31.78 च्या सरासरीने 14 बळी मिळवले. 1974 ते 1983 दरम्यान ते इंग्लंडसाठी 15 वन डे सामनेसुध्दा खेळले. मात्र त्यांची पत्नी येव्हान आणि दक्षिण आफ्रिकेसोबतच्या त्यांच्या प्रदीर्घ संबंधामुळे वर्णद्वेषाचा वाद उफाळून 1980-81 मध्ये वेस्ट इंडिजविरुध्दचा दुसरा कसोटी सामना रद्द झाला होता. गुयाना सरकारने त्यांना व्हिसा नाकारला होता. यामुळे एका न खेळलेल्या सामन्यासाठी त्यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे.

जॅकमन यांना घशाचा कॕन्सर होता.त्यांच्यावर दोन वेळा घशाच्या शस्त्रक्रियासुध्दा करण्यात आल्या होत्या. ख्रिसमसच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी येव्होन व दोन मुली असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER