माय-लेकीवर हल्ला करून चार तोळे सोन्याचे दागिने लुटले

शास्त्रीनगर येथील घटना

chain-snatching

औरंगाबाद : हेडगेवार रूग्णालयामागे असलेल्या शास्त्रीनगरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान तीन चोरांनी एका बंगल्यात शिरून महिलांवर प्राणघातक हल्ला करून अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शास्त्रीनगरमधील प्लॉट क्रमांक ११५ वर डॉ. वाले कुटुंबाचा बंगला आहे. मंगला वाले(६०), अनुसया वाले(८३) आई व मुलगी या दोघीजणी तेथे राहतात.

संध्याकाळी तीन तरूणांनी घरात प्रवेश करून दोघींवर प्राणघातक हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. चोरट्यांनी अनुसया यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चेन व मंगल यांच्या हातातील सोन्याची दीड तोळ्याची बांगडी हिसकावून पोबारा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून सोसायटीतील नागरीकांनी धाव घेतली. घराच्या हॉलमध्ये रक्त सांडलेले होते. नागरीकांनी दोघीना जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

मानेला पकडून भिंतीवर आदळले
दोघींनी चोरट्यांना विरोध केला असता, दोघींना मानेला पकडून त्यांचे डोके चोरट्यांनी भिंतीवर आदळले. यामध्ये दोघी गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. घटनेतील तीनही चोर एकाच दुचाकीवरून आले होते. तिंघांचे अंदाजे वय २० ते २५ असावे. अशी माहिती समोर आली आहे.