कर्ज काढून रस्त्याची कामे पूर्ण करू : अशोक चव्हाण

मुंबई :- राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रीड तयार करून विकास करणार असून ही कामे पूर्ण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून कर्जउभारणी करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था असून अनेक रस्ते अर्धवट अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. विधानसभेत सार्वजनिक बांधकाम विभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.

चव्हाण म्हणाले, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे गेल्‍या दीड वर्षांत ठप्प आहेत. ही कामे केंद्र सरकारच्या एनएचएआयच्या माध्यमातून सुरु आहे. मराठवाडयाला त्‍याचा जास्‍त फटका बसला आहे. मराठवाडयातील २२ पैकी १७ पॅकेजेस बंद आहेत. ही बंद पडलेली कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना करण्यात येणार असल्‍याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्यात नव्या रस्त्यांची कामे हाती घेण्यापेक्षा अपूर्ण असलेली रस्‍त्‍यांची कामे पूर्ण करण्यास प्राथमिकता देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आता रेतीघाटांवर रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल लावण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. केवळ रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडूनच हा टोल घेण्यात येईल. यातून मिळणाऱ्या निधीतून त्‍या-त्‍या भागात सिमेंट रस्‍ते बांधण्यात येणार असल्‍याचेही अशोक चव्हाण म्‍हणाले.