कोरोनात केली रस्ता सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा!

पर्यावरणप्रेमी पोलीस सचिन जाधव यांचा टाकाऊ प्लास्टीक कचऱ्यापासून आगळावेगळा उपक्रम

कोरोनात केली रस्ता सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा!

नाशिक (जिमाका) : लॉकडाऊनमुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अनेकांच्या रोजगारावर गदा आली आणि ते सारे मुंबईतून पायीच आपल्या गावाकडे निघाले. रस्त्यांना त्यांना अनेक सेवाभावी संस्थांनी पॅकिंग अन्न दिले, प्लास्टिक बाटलीतून पाणी दिले. हा सारा कचरा मुंबई-आग्राच्या अवतीभवती तसाच पडलेला असल्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून नाशिकचे एक निसर्गप्रेमी वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी टाकाऊतून टिकावू हे सूत्र अवलंबून या बाटल्यांमध्ये औषधी, वनस्पती, फुलझाडे फुलविली आहेत. त्यांच्या या उपक्रमातून त्यांनी ‘कोरोना’ काळात रस्त्याची सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा केली आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेची हिरवळ आणि दरवळ आता पोलीस स्टेशन, विविध कार्यालयात आणि महामार्गावर दिसणार आहे.

लॉकडाऊनमध्ये मुंबईकडून पायी निघालेल्या परप्रांतियांनी वापरलेल्या खाद्यपदार्थांचे पॅकिंग, प्लास्टिक बाटल्यांचा कचरा सर्वत्र पडलेला पाहून अनेकांना वाईट वाटले. मात्र महामार्गाची स्वच्छता करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. मात्र याच कालावधीत महामार्गावर कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस सचिन जाधव यांना एक कल्पना सूचली आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यात फुलझाडांसह, तुळशी, अडुळसा, अश्वगंधा, कोरफड अशा औषधी वनस्पती लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आता त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेतील ही फुलझाडे आणि औषधी वनस्पती नाशिकमधील विविध पोलीस चौक्या कार्यालये, महामार्गावर बहरलेल्या दिसणार आहेत. हे कार्य करीत असताना जाधव यांनी महामार्गावरील बॅरिकेड्सवरही पर्यावरण रक्षणाचे, जनजागृतीचे फलकही लावले. तसेच काही बाटल्यांमध्ये पाण्याची सोय केली असून, ते पक्ष्यांसाठी ठेवण्यात आले आहे. अनेक तहानलेले पक्षी या भांड्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवित आहेत.

 

पर्यावरणाशी नाते जोडणाऱ्या सचिन जाधव यांनी टाकावूपासून टिकाऊचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या उपक्रमातून कचऱ्याची विल्हेवाट होणार आहेच, शिवाय नाशिक स्मार्ट सिटीलाही मोठा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नाशिकमधील विविध पोलीस चौक्या आणि हद्दीतील महामार्गावर ही रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER