ओव्हरआर्म, अंडरआर्म की साईडआर्म? रियान परागच्या गोलंदाजीवर चर्चा जोरात

Riyan Parag

आयपीएलला (IPL) विवादांचे काही वावडे नाही आणि यंदाच्या आयपीएलमधील पहिला विवाद समोर आला आहे. राजस्थान रॉयल्सच्या (RR) रियान परागच्या (Riyan Parag) गोलंदाजीच्या शैलीवरुन कशा प्रकारची गोलंदाजी वैध आणि कोणती अवैध हा प्रश्न निर्माण झाला आहे. गंमत म्हणजे रियान परागने पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) ख्रिस गेलला (Chris Gayle) हा जो चेंडू टाकला तो नियमाच्या व्याख्येच्या सीमेवर म्हणजे बॉर्डरलाईनवर होता असे क्रिकेटचे नियम ठरवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने(MCC) म्हटले आहे. त्यामुळे अशा गोलंदाजीचे करायचे काय? आणि त्या चेंडूवर कुणी बाद झाला तर त्याला बाद द्यायचे की नाही, हा प्रश्न उपस्थीत झाला आहे. मात्र याबाबतचे अधिकार पंचांना असल्याचे म्हटले असून पंजाब किंग्ज व राजस्थान रॉयल्सदरम्यानच्या सामन्यात हा चेंडू टाकल्यानंतर पंचांनी रियानला ताकिद दिली होती आणि त्यानंतर त्याने तशी गोलंदाजी केली नव्हती.

क्रिकेटच्या नियमांनुसार गोलंदाज ज्यावेळी हातातून चेंडू सोडतो त्यावेळी तो खांद्याच्या वर असायला हवा (Overarm) आणि तसा तो नसेल तर तो अंडरआर्म (Underarm) मानला जातो. मात्र रियान परागचा हा चेंडू त्याच्या खांद्याला जवळपास समांतर (Side arm) होता.

रियान परागची त्या षटकातील गोलंदाजीच विचित्र होती. त्याने लेग स्पिनने सुरूवात केली आणि त्यानंतर त्याने हा चर्चेचा विषय ठरलेला साईड आर्म चेंडू टाकला आणि त्यानंतर पुन्हा ऑफ स्पिन गोलंदाजी करत त्या षटकात विकेटही मिळवली.

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चॅपेल बंधूंच्या पराक्रमाने अंडरआर्म गोलंदाजीवर बंदी आहे. पण रियान परागने नियमात बसेल एवढ्या खाली हात नेत पुन्हा अंडर आर्मचा विषय चर्चेत आणला आहे. तो पाहताच विख्यात समालोचक हर्ष भोगले यांनी सवाल केला, किती खालवरुन टाकलेला चेंडू वैध असतो? माजी कसोटीपटू लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णनने ‘विलक्षण’ असे या गोलंदाजीचे वर्णन केले. मायकेल स्लेटर म्हणाला की रियान थोडक्यात सुटला. मात्र पंचांनी त्याला ताकिद दिल्याचे बघायला मिळाले. याच्या दोनच चेंडूनंतर रियान परागनेच नेहमीच्या शैलीत गोलंदाजी करुन ख्रिस गेलला बाद केले.

सहसा केदार जाधव (Kedar Jadhav) याप्रकारे साईड आर्म गोलंदाजी करताना दिसतो पण रियानचा हा चेंडू त्याच्यापेक्षा कितीतरी खालून आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button