सुशांतच्या बहिणीने सुचविलेल्या ‘अवैध’ औषधावर रिया चक्रवर्तीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

Riya Chakraborty .jpg

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह  राजपूत याचा मृत्यू त्याची बहीण प्रियंका व तिचा मित्र डॉ. तरुण कुमार यांनी ‘अवैध’पणे तोंडी सुचविलेली औषधे (Unauthorised Oral Prescription) घेतल्यानंतर पाच दिवसांनी झाला, असा दावा सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मंगळवारी केला. सुशांत सिंहच्या प्रियंका व मितू सिंह  या दोन बहिणींनी सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा रद्द करावा यासाठी याचिका केली आहे.

त्या याचिकेच्या उत्तरादाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रिया चक्रवर्तीने वरीलप्रमाणे दावा केला असून सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात त्याच्या या दोन बहिणींच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हायला हवी, असे आग्रही मत मांडलेय.  सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे रिया व इतरांविरुद्ध जी फिर्याद दाखल केली त्यास  काटशह देण्यासाठी आपल्याविरुद्ध मुंबईत हा गुन्हा निष्कारण नोंदविला गेला आहे, असे प्रियंका-मितू यांचे म्हणणे आहे.

ही याचिका मंगळवारी न्या. शिवाजी संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे आली. गेल्या तारखेला सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञापत्र केले आहे का, असे न्या.शिंदे यांना रियाचे वकील सतीश मानशिंदे यांना विचारले. त्यावर  मानशिंदे म्हणाले की, आम्ही काल (सोमवारी) रात्रीच प्रतिज्ञापत्र आॅनलाईन दाखल केले आहे.

ते कदाचित लगेच न्यायालयाच्या रेकॉर्डवर आले नसेल. त्यावर न्यायालयाने त्या प्रतिज्ञापत्राची प्रत्यक्ष कागदी प्रत बुधवारी न्यायालयास देण्यास सांगितले. ‘सीबीआय’ला या प्रतिज्ञापत्राला उत्तर द्यायचे असेल तर त्यांनीही ते दाखल करावे, असे सांगून पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी ठेवली गेली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.