प्रतिस्पर्ध्यांनो, सावध व्हा, कारण ‘गब्बर’ आता जागा झालाय!

Shikhar Dhawan IPL 2020

शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणजे गब्बरची ओळख तशी आक्रमक फलंदाजाची आहे पण आतापर्यंत तो आयपीएलमध्ये आणि टी-20 मध्ये शतक करु शकलेला नव्हता हीच आश्चर्याची बाब. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुध्द (Chennai Super Kings) शतक झळकावून हा दुष्काळ संपवला. तब्बल 264 डावानंतर त्याने टी-20 (T-20) मध्ये तीन आकडी धावसंख्या गाठली.

मधल्या काळात शिखरची बॕट फारशी चालत नव्हती पण आता कालच्या खेळीत तो धोके पत्करुन खेळताना दिसला. त्याला मिळालेली चार जीवदाने हे याचेच निदर्शक आहेत. सॕम करन, शार्दुल ठाकूर यांना त्याने फटके लगावले. पुढे सरसावून तो खेळताना दिसला. पहिल्या पाॕवर प्लेमध्ये त्याचा स्ट्राईकरेट 134.25 चा आहे जो क्विंटन डी काॕक व मयांक अगरवालनंतर सर्वोत्तम आहे. आतापर्यंत सावधपणे खेळण्याचा आपल्या स्वभावाच्या विपरीत पवित्रा सोडून आपल्या मूडमध्ये खेळणे गब्बरला फायद्याचे ठरलेले दिसले. रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा या फिरकी गोलंदाजांनाही तो भारी पडला. त्याच्या खेळीत फक्त 10 चेंडू असे होते ज्यावर तो धाव घेऊ शकला नाही. 58 चेंडूच्या नाबाद 101 धावांच्या त्याच्या खेळीत 14 चौकार व एक षटकार होता.

13 वर्षे खेळल्यानंतर पहिले शतक लागले तर ते खासच म्हणायला पाहिजे. नव्हे ते खासच आहे. मी पाॕझिटिव्ह विचार ठेवून खेळलो. काय करायचे हे मी ठरवलेले नसते. मात्र धाडसाने बाहेर येऊन खेळलो असे तो म्हणाला.

आता शेवटच्या तीन डावात तीन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. युएईतील तिन्ही मैदानांवर त्याने अर्धशतक केले आहे त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांनी आता गब्बरपासुन सावध होण्याची वेळ आता आली आहे.

शिखरने आपल्या तब्बल 265 व्या टी-20 डावात शतकाची बोहोनी केली. यासह शतकाआधी सर्वाधिक डाव खेळणाऱ्या फलंदाजात तो दुसऱ्या स्थानी आहे. किरोन पोलार्डने 385 व्या डावात पहिले शतक केले होते तर शाहिद आफ्रिदीने 223 व्या डावात. उमर अकमलला 188 डाव लागले तर विराट कोहलीला 182 व्या डावापर्यंत वाट बघावी लागली होती.

केवळ आयपीएलचा विचार केला तर 13 वर्ष, 168 सामने, 167 डाव आणि 39 अर्धशतकानंतर त्याचे हे शतक लागले आहे. आयपीएल शतकासाठी सर्वाधिक प्रतिक्षेचे हे विक्रम आहेत. त्याच्यानंतर विराट कोहलीचे पहिले आयपीएल शतक 120 व्या डावात, अंबाती रायुडूचे 119 व्या डावात आणि सुरेश रैनाचे 88 व्या डावात लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER