कोल्हापुरात काकाच्या पराभावाचा पुतण्याने घेतला बदला

Rituraj Patil

कोल्हापूर : कोल्हापूर शहर दक्षिणच्या लढतीत भाजपचे विद्यमान आमदार अमल महाडिक यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी ४२ हजार मतांनी पराभव केला. २०१४ साली अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत काका आ. सतेज पाटील यांच्या पराभावाचा वचपा पुतण्या ऋतुराज यांनी काढला.

ही बातमी पण वाचा:- फुटबॉलपटू, यशस्वी उद्योजक ते आमदार, कोल्हापुरातील जाधवांचा प्रवास

२००९ साली झालेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ. पाटील यांनी महादेवराव महाडिक यांच्या विरोधात पॅनेल करत निवडणूक लढविली. परिणामी लोकसभेची तयारी करत असलेले धनंजय महाडिक यांना महादेवराव महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघात सतेज पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरवले. यावेळी झालेल्या काटाजोड लढतीमध्ये साडेचार हजार मतांनी सतेज पाटील यांनी बाजी मारली.

दरम्यान, २०११च्या दरम्यान सतेज पाटील यांची राज्य मंत्री मंडळात वर्णी लागली. बदलत्या राजकीय प्रवाहात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांनी जुळवून घेतले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा प्रचार केला. मात्र, ही दोस्ती औटघटकेची ठरली. अवघ्या काही महिन्यांत होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ अमल महाडिक भाजपच्या उमेदवारीवर सतेज पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरले. अवघ्या १८ दिवसांच्या प्रचारात अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला.

त्यानंतर १४ महिन्यांनी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा पाटील यांनी पराभव केला. त्यानंतर पुन्हा पाटील आणि महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष पेटला. कोल्हापूर जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत मल्टिस्टेटचा मुद्दा पुढे करीत सतेज पाटील यांनी महाडिक विरोधकांची जिल्ह्यात मोट बांधली. खा. धनंजय महाडिक हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार असूनही आमच ठरलय असे ब्रिद वाक्य घेत शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांचा प्रचार केला. धनंजय महाडिक यांना मोठ्या फरकाने पराभावाचा सामना करावा लागला. त्यानंतर काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतील रणांगण तापणार याची प्रचिती लोकसभेच्या निकालाने दिली होती.

आ. सतेज पाटील यांनी पुतण्या ऋतुराज पाटील यांना रिंगणात उतरवले. चुरशीच्या आणि राजकीय प्रतिष्ठतेच्या लढतीत दक्षिणेतील शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारांनी ऋतुराज यांच्या पारड्यात आपले मत टाकले.