
‘दूर्वा’, ‘फुलपाखरू’ यासारख्या सुपरहिट मालिका देणारी, ‘सिंघम स्टार’ या रियालिटी शोची निवेदिका ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने अल्पावधीतच तिचा फॅन क्लब तगडा बनवला आहे. ‘महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय चेहरा’ हा किताबही ऋताने पटकावला होता. सध्या ऋता काय करत आहे, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. तर सध्या ऋता स्ट्रॉबेरी शेक करणार आहे. आता तुम्ही म्हणाल लॉकडाऊनमध्ये (Lockdown) बऱ्याच सेलिब्रिटींनी किचनमधल्या पदार्थांचे व्हिडीओज शेअर केले होते. आता सगळे अनलॉक झाले असताना ऋता अभिनय सोडून स्ट्रॉबेरी शेक का बरे करणार आहे ? पण तिच्या या नव्या प्रोजेक्टचं नावच ‘स्ट्रॉबेरी शेक’ असून चित्रीकरणासाठी तिने पुण्यामध्ये मुक्काम ठोकला आहे.
दूर्वा, फुलपाखरू यासारख्या सुपरहिट मालिका, सिंगिंग स्टार यासारखा सिंगिंग रियालिटी शो आणि ‘स्ट्रॉबेरी शेक’ सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि ‘दादा एक गुड न्यूज आहे’ सारखे एक दर्जेदार नाटक यामधून नावारूपास आलेली सर्वांची आवडती अभिनेत्री ऋता दुर्गुळेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आपली ही आवडती अभिनेत्री सध्या काय करतेय याची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
ऋता ही सध्या पुण्यात असून तिचे शूटिंग जोरदार सुरू आहे. तिने आजवर ‘दूर्वा’ , ‘वैदेही’ , ‘मन्या’ अशा वेगवेगळ्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे केल्या आहेत आणि आता ती तिच्या चाहत्यांसाठी ‘अदिती’ ही एक नवीन भूमिका घेऊन येणार आहे. ‘स्ट्रॉबेरी शेक’चे दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर यांच्यासोबत ओपनिंग फ्रेम मीडिया प्रॉडक्शनद्वारे ती पुन्हा शूट करत आहे. इतकेच नव्हे तर ‘स्ट्रॉबेरी शेक’ची बाकीची टीमसुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे . कलाकार ऋता दुर्गुळे, दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर, लौकिक जोशी, प्रॉडक्शन डिझायनर कमलेश कळसुलकर आणि संगीत दिग्दर्शक निशाद गोलांबरे हे सर्व मिळून पुन्हा काही तरी नवीन भन्नाट घेऊन येणार हे सांगायची गरज नाही.
अदितीची भूमिका देण्याबद्दल तिने दिग्दर्शक शोनील यल्लत्तीकर यांचे सोशल मीडियावर खास आभारसुद्धा मानले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘स्ट्रॉबेरी शेक’च्या टीमचे रिन्युयनच या सेटवर झाले आहे .मात्र तिच्या चाहत्यांना एवढाच प्रश्न पडला आहे की, हे शूट तिच्या येणाऱ्या नवीन सिनेमाचे आहे, शॉर्ट फिल्मचे आहे की एखाद्या मोठ्या ऑनलाईन वेब सिरीजचे हे अजून तरी ही न्यूज गुलदस्त्यात आहे.
कॉलेजमध्ये असतानाच ऋताला ‘दूर्वा’ ही मालिका करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे सोने करत ऋताने एका राजकीय कुटुंबातील सून अत्यंत समर्थपणे रेखाटली. ‘फुलपाखरू’ या मालिकेत ती कॉलेज गर्ल म्हणून रसिकांसमोर आली. ही मालिकादेखील तुफान लोकप्रिय झाली आणि या मालिकेतील वैदेही या भूमिकेला ऋताने चांगलाच न्याय दिला. यशोमान आपटे यांच्यासोबत या मालिकेत तिची अफलातून केमिस्ट्री जुळली. अजूनही या दोघांचे चाहते त्यांना मनदेही या त्यांच्या ऑनस्क्रीन नावाने ओळखतात. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे तिचं पहिलंच व्यावसायिक नाटक. या नाटकात अभिनेता उमेश कामत याच्यासोबत तिने रंगमंच शेअर केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला