ऋता उत्सुक ‘ड्युएट’साठी

Duet

आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच कोणाची तरी साथ आवश्यक असते. जे काम एकट्याने कधी शक्य होत नाही ते जर एखाद्याची साथ मिळाली, तर नक्कीच आयुष्याचा प्रवास सुकर होऊन जातो. या संकल्पनेवर ड्युएट नावाची वेबसिरीज ऑनलाइन पडद्यावर येत आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Rita Durgule) नात्याची एक वेगळी परिभाषा तिच्या अभिनयातून सांगणार आहे. तिचा हा वेगळा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेतच पण दैनंदिन मालिका, निवेदन, नाटक या माध्यमांपेक्षा वेगळं असलेल्या वेबसीरिज या माध्यमात काम करण्यासाठी ऋता देखील प्रचंड आतूर आहे.

लॉकडाउन संपले. मालिकांचे सेट गजबजले. नाटकाचीही तिसरी घंटा वाजली. पण अजूनही चित्रपट इंडस्ट्री रुळावर आलेली नाही. थिएटर्स उघडले असले तरी बॉक्स ऑफीस शांत आहेत. चित्रपट निर्मातेसुद्धा एवढ्या लवकर आपले चित्रपट प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे प्रदर्शित करायला तयार नाहीत. मात्र या काळात सुद्धा वेबसेरीज मोठ्या प्रमाणावर बनत आहेत आणि वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना घरच्याघरी पहायला मिळत आहेत. सध्या मराठीमध्ये एक खूप मनोरंजक आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील नाते संबंधांवर भाष्य करणाऱ्या गोष्टीवर एक नवीन वेबसीरीज तयार होत आहे. या वेबसिरीजमध्ये ऋता मुख्य भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेच्या सहकलाकराचे नाव अजून गुलदस्त्यात असले तरी मराठी चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेला अभिनेता तिच्यासोबत या वेब सीरीज मध्ये काम करत आहे. ओपनिंग फ्रेम मिडिया या निर्मिति संस्थे द्वारे या वेब सीरीजचे दिग्दर्शन स्ट्रॉबेरी शेक फेम दिग्दर्शक शोनिल करत आहेत .

कॉलेजमध्ये असतानाच ऋताला दूर्वा या मालिकेमध्ये काम करण्याची संधी चालून आली. एका राजकीय घराण्यातील सून ही व्यक्तिरेखा तिने तिच्या पहिल्याच मालिकेमध्ये अतिशय उत्तमरित्या साकारली. शरद पोंक्षे. विनय आपटे यांच्यासारखे दिग्गज कलाकार या पहिल्याच मालिकेत तिच्यासमोर होते, पण त्यांच्याकडूनदेखील ऋताने अभिनयासाठी शाब्बासकीची थाप मिळवली आहे. त्यानंतर छोट्या पडद्यावर आलेल्या फुलपाखरू या मालिकेत ऋताने तरुणाईची कथा मांडली. या मालिकेतील तिने साकारलेली वैदेही इनामदारची भूमिका तिच्या चाहत्यांना खूप आवडली. सर्वात आकर्षक महिला असा किताबही तिने तिच्या नावावर कोरला आहे. ऋताच्या डोळ्यावर तिचे चाहते नेहमी फीदा असतात. शिवाय सोशल मीडियावर सतत काही ना काही निमित्ताने ऋता फोटो शेअर करत असते. दोन मालिकांच्या यशानंतर दादा एक गुड न्यूज आहे हे व्यावसायिक नाटकदेखील रंगभूमीवर प्रचंड गाजलं. पहिल्या व्यावसायिक नाटकात ऋताने रंगभूमीवरही ती कमी नाही हे दाखवून दिलं. सिंगिंग स्टार या रियालिटी शोचे निवेदन करताना ऋता दिसली आणि निवेदनाचा प्रांतही तिने तिच्या सहज सुंदर वावराने फत्ते केला.

यापूर्वी ऋताने लघुपटात काम केलेले आहे मात्र सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले ओटीटी प्लॅटफॉर्म हे माध्यम ऋतालाही खुणावत होतं आणि त्याच माध्यमात ऋताची वेबसिरीज प्रदर्शित होणार आहे. ड्युएट म्हणजे दोघं. नातं देखील दोन व्यक्तींमध्ये जुळत असतं आणि हे नातं टिकवून ठेवण्यासाठी त्या दोन व्यक्तींनी एकमेकांमध्ये समरस होणं गरजेचं असतं. याच वनलाइन स्टोरीवर ऋताची ही नवी वेबसिरिज भेटलेली आहे इमोशनल सीन्स देण्यात नेहमीच ऋता भाजी मारते त्यामुळे तिच्या नव्या सिरीजमध्ये ऋताचे भावनिक सीन नक्कीच कमाल करतील असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे.

ऋता सांगते ‘ डुएट ‘ हे माझ्या पहिल्या वेबसीरीजचे नाव आहे आणि माझ्या मनात खूप उत्सुकता आहे. ही आजची गोष्ट आहे. या सिरीजमध्ये अदिती नावाची व्यक्तीरेखा ही एका प्रामाणिक मुलीची आहे. असे पात्र आजवर मी कधीच केलेले नाही. यामुळे एक वेगळीच ऊर्जा आहे . मी केलेल्या इतर सर्व भूमिकांप्रमाणे अदितीची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडेल असे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER